एमआयडीसी परिसरात नविन जलवाहिनीच्या कामास गती

0

भुसावळ । शहरातील एमआयडीसी परिसरात दिवसभर पाणीपुरवठ्याची सुविधा मिळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र, साकेगाव ते एमआयडीसीपर्यंतच्या 11 किलोमीटर अंतरात 350 मिमी व्यासाची नवीन डीआय जलदाब वाहिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून टाकण्यात येत आहे. आतापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाल्याने येत्या उन्हाळ्यात एमआयडीसी परिसरातील पाण्याची समस्या निकाली निघण्यास मदत
होणार आहे.

दोन टप्प्यांमध्ये होणार आहे काम

शहरातील राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे एमआयडीचा विकास होऊ शकला नाही. मात्र कालांतराने परिस्थितीत काही प्रमाणात का होईना बदल होऊन उद्योग येण्यास सुरुवात झाली. तरीही औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेले पाणी नसल्याने एमआयडीसीच्या विकासावर मर्यादा आली होती. सद्य:स्थितीत 500 घ.मी. क्षमतेच्या जलकुंभातून एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. दिवसातून केवळ तास-दोन तास पाणीपुरवठा होत असल्याने उद्योगांच्या विकासाला खीळ बसली. गेल्या उन्हाळ्यात तर चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा झाल्याने केवळ पाण्यावर अवलंबून असलेले उद्योग ठप्प झाले होते. मात्र, येत्या उन्हाळ्यापासून हा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासनाने साकेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून एमआयडीसीतील जलकुभांपर्यंतच्या 11 किलोमीटर अंतरात 350 मि.मी.व्यासाची डीआय जलवाहिनी टाकण्यात येत आहे. सध्या दुसर्‍या टप्प्यात शहरातील राष्ट्रीय महामार्गावरून ही वाहिनी अंथरण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

उद्योगांना-धंद्यांना चालना मिळणार

या जलवाहिनीचे काम दोन टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यात एमआयडीसी ते भुसावळ शहरातील शिवपूर-कन्हाळे चौफुलीवरील महामार्गापर्यंत पाइपलाइन टाकली. दुसर्‍या टप्प्यात साकेगाव जलशुद्धीकरण केंद्र ते शिवपूर-कन्हाळे चौफुलीपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाच्याकडेने पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्णत्वास आहे. साधारण फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होऊन उन्हाळ्यात उद्योजकांना 24 तास पाणीपुरवठा करता येईल. पाण्याची शाश्वत सुविधा असल्याने उद्योगांना-धंद्यांना निश्चितच चालना मिळेल.

जळगाव औद्योगिक क्षेत्र भुसावळ विकास केंद्र यांच्यासाठी संयुक्तपणे तापीतून 8.70 दलघमी पाणी आरक्षणास मंजुरी मिळाली आहे. नवीन जलवाहिनीतून भुसावळ एमआयडीसीसाठी दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी मिळेल. 500 घमी क्षमतेच्या जलकुंभातून हे पाणी एमआयडीसीत वितरित होईल.