भुसावळ । साकेगाव येथील एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण केंद्रातून भुसावळ एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाइन टाकण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे. या महत्वकांक्षी योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरु होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा काळ लागण्याची माहिती सूत्रांनी दिली.
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या पाणीपुरवठा करण्याची पुरेशा प्रमाणात सुविधा नाही. केवळ एकच कूपनलिका असल्याने उद्योजकांना आवश्यकतेनुसार पुरवठा होत नाही. एमआयडीसीमध्ये 24 तास पाणीपुरवठा होण्यासाठी साकेगाव जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी आणण्याचे नियोजन होते. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडल्याने या कामाला विलंब झाला होता. उद्योजकांची मागणी वाढल्याने अखेर पर्यायी मार्ग शोधून पाईपलाइन अंथरण्याचे काम सुरु
करण्यात आले आहे. सरासरी 90 टक्के काम पूर्ण झाल्याने आता एमआयडीसीच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. हा प्रश्न पुर्णपणे सुटल्यास येथील उद्योजकांना पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा करण्यास मदत होईल. केवळ पाईपलाइन जोडणीचे काम अपूर्ण आहे. जोडणी पूर्ण होताच समस्या सुटेल.