जळगाव । मेहरुण मधील दत्त नगरातील रहिवाशी असलेल्या नावेद अख्तर शकीबुद्दीन पिरजादे (वय 25) या तरुणाच्या खून प्रकरणात नावेद ज्या मशिदीत नमाजसाठी गेला तेथून तर शिरसोलीपर्यंत एकुण 32 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज एमआयडीसी पोलिसांनी संकलित केले आहे. दरम्यान, तपासण्यात आलेल्या फुटेजमध्ये अंधारामुळे दुचाकीस्वार असो की अन्य कोणी व्यक्ती यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. उर्वरित फुटेजमध्ये काही तरी निष्पन्न होईल, अशी आशा पोलिसांना आहे. आणखी सीसीटीव्ही मिळविण्यासाठी एक पथक कामाला लागले आहे. सहायक निरीक्षक सचिन बागुल व समाधान पाटील यांचे पथक काही संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले.
नातेवाईकांसह मित्रांची चौकशी
दरम्यान, दोन दिवसात पोलिसांनी 25 जणांची चौकशी केली. तो ज्या ठिकाणी कामाला होता तेथील एका लहान मुलाचीही पोलिसांनी चौकशी केली. त्याच्याकडून काही धागेदोरे मिळतात का? असा प्रयत्न आहे. दरम्यान, रविवारी त्याचे जवळचे नातेवाईक व मित्रांची स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात आली. यात काही महिलांचाही समावेश आहे. शिरसोली येथील आकाशवाणी केंद्राच्या भिंतीला लागून या नावेदचा मृतदेह आढळून आला होता. त्याठिकाणी रविवारी पोलिसांनी पुन्हा भेट दिली. या खूनामागे अनैतिक संबध किंवा धंद्याचा वाद या दोन शक्यतांवर पोलिसांनी फोकस केला आहे.नावेद याची टोपी व टी शर्ट पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. त्या कपड्यांपासून काही बारकावे मिळतात का? याचाही शोध घेतला जात आहे. उपविभागातील शहर, जिल्हा पेठ, रामानंद नगर व शनी पेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे पथक या कामाला लागले आहे. उपअधीक्षक सचिन सांगळे व निरीक्षक सुनील कुराडे यांनी शनिवारी संध्याकाळपासून रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत संशयितांची चौकशी केली.
अशी घडली घटना
दत्तनगरातील शफियुद्दीन पिरजादे हे हातमजुरी करतात. त्यांचा तिसर्या क्रमांकाचा मुलगा नवीदअख्तर हा बीजे मार्केट येथे शरीफ खान यांच्याकडे त काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी वाजता तो शरीफ खान यांच्याकडून कामाचे 100 रुपये घेऊन सायंकाळी घरी रोजा इफ्तार केला. त्यानंतर रात्री वाजता परिसरातील फातेमा मशीदमध्ये कुराण पठणासाठी गेला होता. मशिदीतून रात्री 10 वाजता बाहेर पडल्यानंतर तो घरी आला नाही. तर शनिवारी सकाळी वाजता शिरसोली परिसरातील काही लोकांना आकाशवाणी केंद्राच्या मागच्या रस्त्याच्या कडेला झुडुपात मृतदेह आढळून आला. दरम्यान गळा चिरुन खुन केल्याचे प्राथमिक तपासणी समोर आले यानंतर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.