जळगाव । शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून गौरव झाल्यानंतर आज शनिवारी पोलिस स्टेशनला विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.के.चौबे यांच्याहस्ते ‘आयएसओ 9001-2015’ हे मानांकन प्रदान करण्यात आले. आयएसओ मानांकन मिळविणारे एमआयडीसी हे जिल्ह्यातील तिसरे पोलीस स्टेशन आहे. पोलिसदलाच्या स्मार्ट कार्यप्रणाली अंतर्गत कार्यरत असल्याने आयजी इन्स्पेक्शनच्या दोन तासा आधीच पोलिस ठाण्याला आयएओ मानांकनाचे प्रमाण पत्र प्राप्त झाले. विश्वात 164 देशांत जनसामान्यांच्या समस्यांशी निगडीत सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसाठी आयएसओ’तर्फे मानांकन देऊन गौरविले जाते. जळगाव जिल्ह्यातील 34 पोलिस ठाण्यांत सर्वाधिक गुन्हे, दोन महामार्गांचा उपद्व्याप, शहरातील सर्वाधिक संवेदनशील, जातीय दंगलींची पार्श्वभूमी असलेले, ग्रामीण भागाची हद्द आणि एमआयडीसी परिसराचा व्याप असा डोलारा सांभाळणार्या एमआयडीसी पोलिस ठाण्याने अखेर आयएसओ’ मानांकनाकन पटकावले आहे. महाराष्ट्र पोलिसदलातील स्मार्ट पोलिस ठाण्यासाठी जिल्ह्यातून नशिराबाद आणि एमआयडीसी अशा दोन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव पोलिस अधिक्षकांनी जानेवारी महिन्यातच महासंचालक कार्यालयास पाठवले. स्मार्ट पोलिस ठाणे अंतर्गत वाटचाल सुरु असतांनाच एमआयडीसी पोलिस ठाण्याने आयएओ साठी प्रयत्न चालवले होते.
टिमने तपासली कार्यतत्परता
‘आयएसओ’शी निगडीत अधिकार्यांच्या टिमने वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्यत्परता, निटनेटकेपणा, जन सामान्यांशी सन्मानाची वागणुक, हद्दितील 30 गावात व्यक्ती निहाय संपर्क(ह्युमन नेटवर्कींग), जनमानसात पोलिस ठाणे व तेथील अधिकार्यांबाबतची माहिती आणि त्यांच्याशी संपर्क,दाखल गुन्ह्यांचा निपटारा, दस्तऐवज कागदपत्रे सांभाळण्याची नेमकी पद्धत, स्वच्छा, आगंतुकासाठी सोय आदी विवीध पातळ्यांवर सर्वेअर, जावेद खान सर (मुख्य) यांच्या मार्गदर्शनात प्रमोद पाटील, वैशाली पाटील, ज्युली यादव (दिल्ली) आदींची टीमने कार्यतत्परता तपासुन बघीतली.
नागरिकांशी साधला संवाद
पोलिस ठाणे अंतर्गत 30 गावे, भलामोठा औद्योगीक परिसर, शहरातील संवेदनशील भाग आणि उपलब्ध संख्याबळ यावर कार्यतत्परता तपासण्यात आली. आयएसओ टीमच्या एकेक अधिकार्याने ठिकाणे निवडून प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधला. त्यात तांबापुरा, मेहरुण, औद्योगिक वसाहत परिसर, कुसुंबा, म्हसावद आणि शिरसोली आदी ठिकाणी लोकांमध्ये मिसळून काही माहिती संकलित केली. त्यात सर्वेक्षण कसोट्यांवर तपासणी केली. एक-दोन अधिकार्यांनी दाखल गुन्हे, त्यांचा निपटारा, तक्रारदारांच्या समाधानाची पद्धत यासंदर्भातील सर्वंकष माहिती संकलित केली. बिल्डिंग, विभागनिहाय माहिती फलक, पिण्याच्या पाण्याची सुविधा, परिसरातील स्वच्छता आदींची त्रयस्थ पाहणीही करण्यात आली.
अशी केली चाचपणी …..
पोलिस ठाण्यात डमी व्यक्ती पाठवून ठाणे अंमलदाराचा प्रतिसाद तपासणे, हद्दीत संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकार्याचा दरारा तपासणे, एखाद्या पानटपरीजवळ उभे राहून मुद्दाम पोलिसांप्रती उलट प्रतिक्रिया नोंदविणे आदी विविध पातळ्या व सारण्यांवर सर्वेक्षणार्थींनी सर्वेक्षण पुर्ण केले. त्यात थेट दिल्ली कार्यालयातुन कर्मचार्यांशी संपर्क करुन सौजन्य आणि कामाबद्दल जागृकता तपासण्यात आली. पोलिस ठाण्यात हजर कर्मचार्यांची तक्रारदारांशी वागणूक, गणवेश, कार्यालयीन दस्तऐवज ठेवण्याची पद्धत आदींची पाहणी करण्यात येऊन चित्रांकन करण्यात आले आहे.
संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर
एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत सर्वाधिक संवेदनशील ठिकाण व अपघात स्थळ असल्याने अशा ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यासाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रेमंड चौक, काशिनाथ चौक, अजिंठा चौक, इच्छादेवी चौक, फुकटपरा, बिसमिल्ला चौक, आदित्य चौक व अब्दुल हमीद चौक आदी ठिकाणी 36 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचा नियंत्रण कक्ष इच्छादेवी चौकी व पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणी उभारण्यात आला आहे.
आयजींनी केली वार्षिक तपासणी
जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विययकुमार चौबे हे जळगावात आले होते. सकाळी जलतरण व मल्टीपर्पज हॉल नुतणीकरणाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी पोलिस दलाची वार्षिक तपासणी केली. यात त्यांनी निलंबी पोलिस कर्मचार्यांचा आढावा घेतला. यानंतर पोलिस मुख्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यासोबतच मोटार परिवहन विभाग, आयुधिक कर्मशाळा, बिनतारी संदेश विभाग, पोलिस दवाखाना आदी ठिकाणी भेट देवून पाहणी केल्यानंतर पोलिस दरबार घेण्यात आला. यानंतर उपविभागीय पोलिस अधीकार्यांच्या मुलाखती तसेच स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख व लिपीकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.