एमआयडीसी बाधित शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसंदर्भात उद्योगमंत्र्यांशी चर्चा

0

आमदार सुरेश गोरे यांचा पुढाकार; विविध विषयांचा आढावा

चाकण/शेलपिंपळगाव : चाकण औद्योगिक क्षेत्रातील बाधित शेतकर्‍यांचे अनेक वर्षांपासून विविध प्रश्न प्रलंबित आहेत. बाधित शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसंदर्भात आमदार सुरेश गोरे यांनी शेतकर्‍यांसह मुंबई, मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, लवकरच सर्व प्रश्‍न सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन याप्रसंगी उद्योगमंत्र्यांनी दिले.

यांची होती उपस्थिती
उद्योगमंत्र्यांच्या भेटीप्रसंगी आमदार सुरेश गोरे, विलास काळे, संपत आंद्रे, मारुती आंद्रे, काशिनाथ आंद्रे, गणेश आंद्रे, ज्ञानेश्वर आंद्रे, सचिन बुट्टे, तानाजी केंदळे, पंढरीनाथ आंद्रे, मारुती माताळे, शिवाजी माताळे, नारायण मिंडे, दत्तात्रय टेमगिरे, दत्तात्रय पडवळ, बाबुराव शिवेकर, अंकुश कदम, संदीप बोत्रे, दिलीप शिवेकर, अमोल पाचपुते, राहुल फडके, धनंजय फडके, नवनाथ फडके, अतुल फडके उपस्थित होते.

स्वतंत्र अ‍ॅक्शन प्लॅन
या बैठकीमध्ये एमआयडीसीने नुकत्याच टप्पा क्रमांक दोनमधील शेतकर्‍यांना काढलेल्या नोटिसीबाबत धोरणात्मक निर्णय घेणे तसेच आमदार सुरेश गोरे यांच्याकडे प्राप्त एकूण 43 तक्रारअर्जांच्या अनुषंगाने निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. सिडकोच्या परताव्याच्या धर्तीवर परताव्याची जमीन बाधित शेतकर्‍यांना मिश्र वापर अनुदेय करण्याचा ठराव मंजूर करून घेण्याचे आश्वासन यावेळी उद्योगमंत्र्यांनी दिले. तसेच एमआयडीसीकडून मिळालेल्या निवासी भूखंडांबाबत बांधकाम नियमावलीत बदल करून वाढीव एफएसआय देण्याचा समावेश करण्यात येईल. बाधित शेतकर्‍यांसाठी अतिरिक्त भूखंड वाटपासाठी स्वतंत्र अ‍ॅक्शन प्लॅन राबविण्यात येईल, असेही उद्योगमंत्र्यांनी सांगितले.

13 प्रकरणांची कार्यवाही पूर्ण
आमदार सुरेश गोरे यांनी प्रलंबित असणार्‍या 43 प्रकरणांचा आढावा अधिकार्‍यांसोबत घेतला. त्यापैकी 13 प्रकरणांची कार्यवाही पूर्ण झाल्याचा अहवाल शासनाने दिला. यामधे 15 टक्के परतावा मिळणे, 15 टक्के परताव्यात कमी भरलेली जमीन मिळणे, एमआयडीसीचे अतिक्रमण दुरुस्त करणे, परताव्याच्या प्लॉटला रस्ता करून देणे, परताव्याचा मोजून ताबा देणे, अशी प्रकरणे समाविष्ट आहेत. उरलेली प्रकरणे अंधेरी मुख्यालयाकडे फेरसादर केली असून, त्यावर सकारात्मक भूमिका शासन घेणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.