मुंबई : पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) तीन एकर जमिनीच्या संदर्भात माहिती देण्याबाबत पुन्हा एकदा विधानसभेत मुद्दा उपस्थित करत माहिती न मिळाल्याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी खंत उपस्थित केली. वरिष्ठ असून गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारलेली माहिती उद्योगमंत्र्यांनी अजूनही दिलेली नसून या अधिवेशनात तरी मिळणार आहे का, असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत खडसे यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी खडसे यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’ नियमांतर्गत हा मुद्दा उपस्थित केला. खडसे यांनी यावर माहिती देण्याबाबत आदेश देण्याची अध्यक्षांना मागणी केली.
मागील अर्थसंकल्पात मागितली माहिती
खडसे यांनी उद्विग्नता व्यक्त करताना सांगितले की, भोसरी एमआयडीसीतील तीन एकर जमीन खरेदीमध्ये नियम, परिपत्रक आणि एमआयडीसी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लंघन केले याची माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागितली होती मात्र ती अद्याप मला मिळालेली नाही. भसंपादन, एमआयडीसी ऍक्ट परिपत्रक रद्द झाले का? ते जिवंत आहे की मेलेय? असा सवालही त्यांनी केला. यंदाच्या अधिवेशनात तरी ही माहिती उद्योगमंत्री देणार आहेत का? असा सवाल त्यांनी केला. ही माहिती मागण्याचा मला अधिकार आहे. अधिवेशन संपण्यापुर्वी संपुर्ण माहिती सादर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी अध्यक्षांकडे केली.
अध्यक्षांनी दिले माहिती देण्याचे आदेश
यावेळी उद्योगमंत्री देसाई अनुपस्थित असल्याने उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी अधिवेशनात सविस्तर माहिती संकलित करून पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र पटलावर माहिती नको तर सभागृहात माहिती द्यावी अशी मागणी खडसे यांनी करत उत्तरावर समाधान न झाल्यामुळे खडसे यांनी उद्योगमंत्री कुठे आहेत असा प्रश्न विचारला. दरम्यान अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अधिवेशन संपण्याच्या आधी माहिती सभागृहाला देण्यासंदर्भात आदेश दिले.