अपात्र शेतकर्यांना हक्काची जमीन मिळण्याचा निर्णय
आमदार सुरेश गोरे यांच्या प्रयत्नांना आले यश
राजगुरुनगर- जमीन संपादन झालेल्या बाधित शेतकर्यांनी मुदतीत 15 टक्के परतावा मागणी अर्ज न केल्यामुळे औद्योगिक महामंडळाने त्यांना अपात्र ठरविले होते. परंतु मोबदला देण्याच्या अटीवरच जमिनी संपादित केलेल्या असल्याने फक्त मुदतीत अर्ज न करण्याचे कारण दाखवून शेतकर्यांवर अन्याय झाल्याचे आमदार सुरेश गोरे यांनी उद्योग मंत्री यांचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना परतावा देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुषंगाने उद्योग मंत्री आणि औद्योगिक विकास महामंडळाने 15 टक्के परतावा शेतकर्यांना देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना खर्या अर्थाने न्याय मिळाला आहे. लवकरच महामंडळ यासंदर्भात आदेश काढणार आहे, असे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले. परतावा म्हणून मिळालेल्या भूखंडामधे 33 टक्के कमर्शियल वापर करण्याच्या मागणीवर शासनाने सकारात्मक पावले उचलली असून नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली याबाबतची सविस्तर नियमावली तयार करण्यात येत असल्याचे यावेळी अधिकार्यांनी सांगितले.
खेड तालुक्यातील औद्योगिक विकास महामंडळाकडील तसेच सेझच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांनी बाधित शेतकर्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी खेड तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश वाडेकर, कैलास गाळव, महादेव लिंभोरे, ऍड. विजयसिंह शिंदे, सुधीर वाघ, बाबाजी शेटे तसेच निमगावचे सरपंच बबनराव शिंदे, माजी सरपंच कैलास थोरात, बी. टी. शिंदे, संतोष शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
मागणीनुसार रस्ता करण्याचे मान्य
चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र.2 मधील मौजे कोरेगाव खु. येथील ऐनाडेवस्ती, राजूबाई वस्ती, कडूसकरवस्ती व गाळववस्ती या वस्त्यांना जाणारा रस्ता शिवरस्ता हा एका खासगी कंपनीने त्यांच्या मालकीच्या जागेतून जात असल्याने बंद केल्यामुळे तेथील लोकांचे जाण्यायेण्याचे प्रचंड हाल होत होते. ठाकरवस्त्यांना जाणेयेणे साठी रस्त्याची आवश्यकता असल्याची मागणी आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी केली होती. लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने ठाकर वस्तीकडे रस्ता करण्याचे मान्य केले असून त्याच कंपनीच्या जागेतून रस्ता करण्याचे काबुल केले आहे. रस्त्यासाठी लागणारी जवळपास 432 चौ.मी जागा ही कंपनीच्या जागेतून वगळून रस्ता करून देण्याचे मा.उद्योग मंत्री यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे जाण्यायेण्यासाठी ठाकरवस्ती वरील लोकांना हक्काचा आणि जवळचा रस्ता मिळाला आहे.
उद्योगमंत्र्यांनी दिले आश्वासन
सेझ मधील संपादित केलेल्या निमगाव मधील देवस्थानची जागा तसेच ठाकर वस्ती असलेली जागा संपादनातून वगळण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला असून प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक असलेल्या सर्व जागा वगळण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी उद्योग मंत्री यांनी दिले तसेच बक्षी समितीचा अहवाल शासनास सादर झाल्यानंतर सेझ मधील 13 गावांमधील उरलेली 7 गावे सेझमधून वगळण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.