‘एमआरआयडीसी’साठी राजकीय इच्छाबळाची आवश्यकता

0

पुणे । महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे यांच्या वतीने महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्टक्चर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडची (एमआरआयडीसी) स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीचे कार्यालय पुण्यात सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील चार खासदार व पालकमंत्री यांनी पुढाकार घ्यावा, असा सूर प्रवाशांतून उमटत आहे. दरम्यान, हे कार्यालय पुण्यातच सुरू करावे, अशी मागणी दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

शहराचा विस्तार वाढला
या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 4 हजार 767 कोटी रुपये रेल्वे प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. पुणे जिल्ह्याचा वाढता विस्तार आणि जिल्ह्याला खेटून असलेल्या शहराचा विकास आणि वाहतूक दळणवळणाच्या सोयी, सुविधा वाढत आहेत. काही वर्षात पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.शहरालगत असलेल्या परिसरात तसेच दौंड, बारामती या तालुक्याचा विस्तार झाला आहे. या दोन तालुक्यातील चाकरमानी शहरात येतात. विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे कार्यालय पुण्यात सुरू करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

गट तट विसरून प्रयत्न व्हावेत
शहरासह जिल्ह्यात एकूण चार खासदार पुण्याच्या वाट्याला आहे. खासदार अनिल शिरोळे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे या चार खासदारांची एकजूट आणि पक्षविरहित पाठपुरावा तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी योगदान दिल्यास हे कार्यालय पुण्यात सुरू होण्यास सुलभ होणार आहे. त्यासाठी राजकीय गट-तट बाजूला ठेवून पाठपुराव्याची मागणी रेल्वे प्रवाशांतून होत आहे.

महामेट्रोचे मुख्यालय हे नागपूरात आहे. त्याचप्रमाणे एमआरआयडीसीचे मुख्याय पुण्यात असावे. पुण्यात मुख्यालय झाल्याने पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक या सहयाद्रीच्या पट्ट्यातील प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे हे कार्यालय पुण्यात असावे. याबाबतचे निवेदन रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
– विकास देशपांडे
मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती, सदस्य