एमआरआय मशीनने तरुण गिळला; अत्यंत थरारक मृत्यू!

0

मुंबई (प्रतिनिधी)- जीवाचा थरकाप उडविणारी दुर्घटना मुंबईतील नायर रुग्णालयात घडली आहे. रुग्णालयाच्या एमआरआय मशीनने ऑक्सिजन सिलिंडर धरलेल्या रुग्णाच्या मुलास अक्षरशः ओढून घेतले. त्यातच मशीनमध्ये अडकलेल्या या तरुणाच्या हातातील ऑक्सिजन सिलिंडर फुटल्याने त्यातील सगळा गॅस त्याच्या तोंडात जाऊन पोट व शरीर फुगले, त्याचे डोळे बाहेर लोंबकाळले. त्यातच त्याचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या घटनेला कारणीभूत ठरून संबंधित डॉक्टरसह वॉर्ड बॉय व महिला कर्मचारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मृतकाच्या नातेवाईकांना राज्य सरकारने तातडीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेने सर्वत्र संताप अन् हळहळ व्यक्त होत होती. ही मशीन उच्चचुंबकीय असल्याने तिच्याजवळ लोखंड किंवा अन्य वस्तू नेता येत नाहीत. तरीही सिलिंडर घेऊन जाण्याचा सल्ला त्या तरुणाला देण्यात आला होता. या घटनेची सरकारकडूच उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

आईच्या मदतीसाठी गेलेल्या मुलावरच काळाचा घाला
राजेश मारूती मारू (वय 32) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याची आई नायर रुग्णालयात दाखल आहे. तिची एमआरआय तपासणी केली जाणार होती. त्यासाठी आईला लावलेले सिलिंडर घेऊन एमआरआय मशीन असलेल्या खोलीत त्याला पाठविण्यात आले. खोलीत जाण्यापूर्वी त्याच्या अंगावरील इतर वस्तू काढून घेण्यात आल्यात. तो नाही म्हणत असतानाही ऑक्सिजन सिलिंडर घेऊन त्याला या मशीनच्या खोलीत पाठविण्यात आले. ही मशीन सुरु असल्याने राजेशला मशीनने अक्षरशः खेचून घेतले. सिलिंडर पकडलेला राजेश मशीनमध्ये अडकला. त्यातच सिलिंडरही फुटले व सगळा वायू त्याच्या तोंडातून शरीरात गेला. पोट व शरीर फुगून, तसेच डोळे बाहेर निघून राजेशचा तडफडून मृत्यू झाला. वॉर्ड बॉयच्या सहाय्याने त्याला अथक प्रयत्नांनी मशीनमधून बाहेर काढण्यात आले. ही मशीन इलेक्ट्रोमॅग्नेटीक असल्याने या व्यक्तीजवळ असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरला मशीनने आपल्याकडे खेचले, त्यातील गॅस बाहेर पडून तो मृत्युमुखी पडला, अशी माहिती अग्निपाडा पोलिसांनी दिली.

भाजप आमदाराचे रुग्णालयातच आंदोलन
या दुर्देवी मुलाच्या मृत्यूनंतर भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन डीन यांना धारेवर धरले. त्यांच्याच कार्यालयात बसून निषेध आंदोलन केले. ही दुर्घटना केवळ रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे झाल्याने सरकारच्या आदेशावरून अग्निपाडा पोलिसांनी संबंधित डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि महिला कर्मचारी अशा तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा भादंविच्या 304 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रुग्णालय प्रशासनानेही या तिघांचे तातडीने निलंबन केले आहे. डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण आणि सुनीता सुर्वे अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देत, राज्य सरकारने मृतकाच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.