कोल्हापूर : एमएच-14-1532 हीच ती बस जीचा बुधवारी कोल्हापूरात अपघात झाला. मात्र या बसचा इतिहास सध्या सगळीकडे व्हायरल झालेला दिसतो. कोल्हापूरमध्ये 10 वाहनांना धडक देऊन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी बस, ही पुण्यातल्या संतोष माने प्रकरणातलीच बस असल्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या घटनेचीच पुनरावृत्ती असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात रंगली होती.
25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातल्या रस्त्यांवर बेदरकारपणे गाडी चालवून संतोष मानेने 9 जणांचा बळी घेतला होता. त्या अपघातात वापरलेली बस ही एमएच-14 बीटी- 1532 नंबरची होती. तर कोल्हापुरातही बुधवारी झालेल्या अपघातामध्ये याच बसने 10 वाहनांना धडक दिली.
उमा टॉकीज चौकातून बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एमएच-14 बीटी- 1532 नंबर एसटी बस जात होती. या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने 10 ते 15 वाहनांना धडक दिली. यात 5 वाहनांचे नुकसान झाले आहे. एकीकडे गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील अपघात झाल्यानंतर हीच बस कोल्हापूरात पाठवली होती. त्यामुळे या दोन्ही अपघातातील बस ती एकच असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
2012 मध्ये ठरली कर्दनकाळ
25 जानेवारी 2012 रोजी स्वारगेट आगारातून बाहेर आणून संतोष माने या माथेफिरू चालकाने बस बेफानपणे चालवत तब्बल 35 वाहनांना ठोकरले होते. 9 जणांना चिरडले होते. नंतर ही बस कोल्हापूर आगाराकडे सोपवण्यात आली होती. तीच एसटी बस घेऊन हुपरी रंकाळा मार्गावर प्रवासी वाहतूक करणारे चालक रमेश सहदेव कांबळे यांना धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि कोल्हापूरकरांनी उमा टॉकीज चौकात भीषण थरार आणि भयनाट्य अनुभवले. हा थरार दोन जणांचा जीवावर बेतला तर 9 जण जखमी झाले. पाच वर्षांनंतर अगदी तशाच पद्धतीचा थरार करत एमएच 14 बीटी 1532 बसने कोल्हापूर शहरात केलेल्या अपघातामुळे अंधश्रद्धा आणि उलटसुलट चर्चेला उत आला आहे.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये
कोल्हापुरात काल (बुधवारी) झालेल्या या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. तसेच जखमींना सुद्धा तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.