एमएमआरडीएच्या क्षेत्रात गिरणी कामगारांना घरे

0

मुंबई- गरणी कामगारांसाठी एमएमआरडीए क्षेत्रात ५० टक्के घरे राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर आज चर्चा उपस्थित केली होती. गिरणी कामगारांना मुंबईत घरे दिली जात आहेत. मात्र अनेक गिरण्यांची जमीन म्हाडाकडे हस्तांतरीत झालेली नाही. त्यामुळे गिरणी कामगारांच्या संख्येच्या तुलनेत घरांची संख्या कमी आहे. या कामगारांना एमएमआरडीए क्षेत्रात म्हणजे ठाणे, डोंबिवली, पनवेल या विभागात घरे दिली पाहिजेत, अशी मागणी तटकरे यांनी केली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीए क्षेत्रात गिरणी कामगारांसाठी ५० टक्के सदनिका राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा केली. गिरण्यांच्या जागेबाबतच्या नियमातही बदल करण्यात येत असून त्यामुळे एकूण जमिनीच्या ३३ टक्के जागा म्हाडाला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.