मुंबई । मुंबईत एमएमआरडीएने उभारलेल्या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट एमएमआरडीएने करायला हवे. तसे पालिकेतर्फे एमएमआरडीएला कळविण्यात येणार आहे; मात्र जर एमएमआरडीएने नकार दिला, तर मुंबई महापालिका स्वतः निविदा मागवून या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. शिवसेनेच्या सदस्या शीतल म्हात्रे यांनी मुंबई शहर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर येथील लहान-मोठ्या पादचारी पुलांचे आणि स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेने करावे, अशा मागणी ठरावाद्वारे सभागृहात केली होती. मुंबईत अनेक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पादचारी पूल व स्कायवॉक उभारण्यात आले आहेत, मात्र त्यांचे परिरक्षण न केल्याने काही पूल मोडकळीस आले आहेत, अनेक पूल, स्कायवॉक हे गर्दुल्ले, भिकारी यांचे अड्डे बनले आहेत. दहिसर येथील स्कायवॉक पुलाचा काही भाग अचानक पडल्याची व त्यात काहीजण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.
पालिका स्वतः निविदा मागवून ऑडिट करणार
हे स्कायवॉक त्यांनी 2015 मध्ये, आहे त्या स्थितीत पालिकेच्या स्वाधीन केले. त्यामुळे एमएमआरडीएने उभारलेल्या या सर्व स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट एमएमआरडीएने करायला हवे. तसे पालिकेतर्फे एमएमआरडीएला कळविण्यात येणार आहे. मात्र जर एमएमआरडीएने नकार दिला तर मुंबई महापालिका स्वतः निविदा मागवून या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे, असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.
ऑडिटसाठी सल्लागारांची नियुक्ती
ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महापालिकेने या पादचारी पुलांचे आणि स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली होती. त्यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपले अभिप्राय देताना पालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व पादचारी पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी शहर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे तीन सल्लागारांची नियुक्ती यापूर्वीच केली असल्याचे म्हटले आहे. मुंबईत एमएमआरडीएने 2010 ते2013 या कालावधीत काही ठिकाणी स्कायवॉक उभारले होते.