‘एमएस बस’ एसटीच्या सेवेत दाखल

0

दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत झाली बसची बांधणी

पिंपरी-चिंचवड : दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत बांधणी करण्यात आलेली एमएस बस एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या बस ताफ्यात दाखल होण्यासाठी ही बस मंगळवार दापोडी येथून मार्गस्थ करण्यात आली. यावेळी कार्यशाळा व्यवस्थापक आर. जी. कांबळे, उपअभियंता कोलारकर, उत्पादन अधीक्षक चिकोर्डे, कोच अधीक्षक पाटील, सिनिअर अकाउंटंट ऑफिसर जगताप, चंद्रकांत चव्हाण, उपअधीक्षक ढावरे, राजपूत, पोटे, गिरी, डॉ. इनामदार, झिलपिलवार यांच्यासह युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

अतिशय आरामदायी बस
बाहेरून आकर्षक दिसणारी एमएस बस आतूनदेखील तेवढीच आकर्षक आणि आरामदायी आहे. ही बस प्रवाशांना साध्या दारात उपलब्ध होणार आहे. बैठक व्यवस्था आरामदायक आहे. या बसला रूट बोर्ड बसविण्यात आला आहे. यामुळे ही बस कुठपासून ते कुठपर्यंत प्रवास करणार आहे, याची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळणार आहे. बसमध्ये माईक सिस्टम बसविण्यात आली आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी उतरण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. बर्‍याच वेळा बसमध्ये जास्त गर्दी झाली तर, उभे राहण्यासदेखील जागा मिळत नाही. एमएस बसमध्ये उभे राहण्यासही मोठा स्पेस ठेवण्यात आला आहे. सर्व प्रकारे अत्याधुनिक आणि प्रवाशांसाठी आरामदायी बस औरंगाबाद विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली आहे.