एमओएच शेडमध्ये भंगार साहित्याने घेतला पेट

0

भुसावळ : येथील रेल्वेच्या एमओएच शेडमध्ये भंगार साहित्याला आग लागून नुकसान झाल्याची घटना गुरुवार 15 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. आग विझविण्यासाठी नगरपालिका अग्नीशमन बंबासह आयुध निर्माणीचे बंब बोलविण्यात येऊन आग विझविण्यात आली. यात फारसे नुकसान झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. रेल्वेच्या इंजिन दुरुस्ती कारखान्यात खराब झालेले साहित्य एका ठिकाणी जमा करण्यात येत असते. याठिकाणी खराब झालेल्या वायर्स तसेच विद्युत साहित्य फेकण्यात येते. मात्र यालगतच खराब ऑईलच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या असून परिसरातील सुकलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने हि आग भंगार साहित्यापर्यंत जाऊन ऑईलमुळे हि आग वाढली.

मात्र कर्मचार्‍यांंच्या लक्षात हि बाब येताच त्यांनी लागलीच बाजुलाच असलेल्या आयुध निर्माणीचे अग्नीशमन बंब व भुसावळ नगरपालिकेचे बंब पाचारण केले. अग्नीशमन दलातील कर्मचार्यांनी या आगीवर पाणी टाकून ती विझविण्यात आली. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता हा विभाग रेल्वेचे जीएम यांच्यांशी संबंधित असल्याने स्थानिक अधिकार्यांकडून माहिती मिळू शकली नाही. दरम्यान अशाच प्रकारे बाजूला असलेल्या पीओएच शेडमध्ये देखील काही महिन्यापूर्वीच भंगार साहित्याला भीषण आग लागली होती. यात रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.