एमओएच शेडमध्ये भंगार साहित्याला लागली आग

0

भुसावळ। मध्य रेल्वेच्या एमओएच शेडमध्ये भंगार साहित्याला आग लागून नुकसान झाल्याची घटना गुरुवार 23 रोजी दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. यात नुकसानीचा आकडा कळू शकला नाही.

जीव मुठीत घेऊन करावे लागते काम
एमओएच शेड मध्ये काही खराब झालेले साहित्य भंगार गोडाऊला टाकले जाते. दुपारच्या सुमारास या साहित्याला अचानकपणे आग लागली. या आगीने मोठा भडका घेतल्याने कर्मचार्‍यांमध्ये एकच धावपळ उडाली. हि आग विझविण्यासाठी नगरपालिका, आयुध निर्माणी व दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील अग्नीशमक दलाचे बंबास पाचारण करण्यात आले होते. आग लागण्याचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. दरम्यान काही महिन्यांपूर्वी एमओएच शेडमध्ये अशाच प्रकारची आग लागली होती. तर गेल्या वर्षी उन्हाळ्यात पीओएच शेड मध्ये देखील भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. अशा घटना लक्षात घेता रेल्वेकडे स्वत:चे अग्नीशमन यंत्रणा नाही, त्यामुळे नगरपालिकेसह इतर ठिकाणहून अग्नीशमन बंब मागवावे लागतात. याठिकाणी हजारो कर्मचारी नियमितपणे काम करीत असतात. त्यामुळे या कर्मचार्‍यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.