एमडीएईच्या प्लेसमेंट्समध्ये ८९ टक्के विद्यार्थ्यांना मिळाली नोकरीची ऑफर

0

मुंबई : मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स (एमडीएई) या अर्थशास्त्र अभ्यासक्रमातील भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थेच्या २०१८-१९ च्या प्लेसमेंट मोहिमेत विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण कंपन्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे. एमडीएईमधून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदविका स्वीकारणाऱ्या ८९ टक्के विद्यार्थ्यांना बॅंकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस (बीएफएसआय), सार्वजनिक धोरण, समुपदेशन, डेटा अॅनालिस्टिक्स आदी क्षेत्रातील बड्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी वा इंटर्न म्हणून निवडण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये प्लेसमेंट्सचा कालावधी सुरू झाला असून जुलै २०१८ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. एमडीएईच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रक्रियेत इतक्या मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी उचलून धरल्यामुळे, अर्थशास्त्र क्षेत्रात रोजगारक्षम उमेदवार देण्याच्या एमडीएईच्या कटीबद्धतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

एमडीएईचे सीओओ करण शहा म्हणाले, “सतत बदलणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या कार्यक्षेत्राच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याकरिता विशेष कौशल्ये आणि शैक्षणिक भूक असणारी विद्यार्थ्यांची भावी पिढी निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांना कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष काम करणे सोपे जावे व त्यांना यश लाभावे, तसेच, प्रत्यक्ष कामाचा अनुभव विद्यार्थीदशेतच घेता यावा, यासाठी आम्ही प्रशिक्षण, मार्गदर्शन व नेटवर्किंग संधीही विद्यार्थ्यांना पुरवतो. आमचे ४-५ विद्यार्थी बड्या कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या काम करीत आहेत आणि कंपन्या प्लेसमेंटसाठी पुन्हा आमच्याकडे येत आहेत, हेच आमच्या प्रयत्नांचे यश आहे.”

जेपी मॉर्गन, एडेलवाईज टोकियो, रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलण्ड, एक्झिम बॅंक, जॉन्स लॉंग लासेल (जेएलएल), अॅर्न्स्ट अॅण्ड यंग आणि थिंक अनालिस्टिक्स या सात कंपन्यांनी एमडीएईच्या प्लेसमेंट मोहिमेत प्रथमच सहभाग घेतला आहे. डेलॉईट, आयडीएफसी इन्स्टिट्यूट, गेटवे हाऊस, कॉलियर्स इंटरनॅशनल, फ्रॅक्टल अॅनालिस्टिक्स, डेसिमल पॉइंट अॅनालिस्टिक्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या सहभागानंतर यंदाही या प्रक्रियेत सहभागी होऊन शिक्षणसंस्थेच्या पदवीधारकांप्रति व दर्जाप्रति विश्वास व समाधान व्यक्त केले आहे.