एमडी असल्याचे भासवून फसवणूक करणार्‍या महिला डॉक्टरचा पर्दाफाश

0

जळगाव- कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यावर महिलेच्या पोटात शस्त्रक्रियेदरम्यान कापसाचा बोळा राहिला होता. यानंतर संबंधित महिलेस तिचे वायु दलात कार्यरत पतीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून ग्राहक सेवा संघाकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर संघाने चौकशी केल्यावर डॉ. सुनीती बेेंद्रे हे एमबीबीएस असताना एमडी असल्याचे भासवून फसवूणक करत असल्याचे लक्षात आले होते. संघाने नुकसान भरपाई देण्याच्या सुचना केल्या असता उलट डॉ. बेेंद्रे यांनी ग्राहक सेवा संघाविरोधात मानहानीचा दावा केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने या दाव्यावर निकाल दिला असून 1 लाख रुपय देण्याचे आदेश रद्द केले असल्याची माहिती पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाचे सरचिटणीस प्रा.डी.एफ पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. न्याय मिळावा म्हणून 17 वर्ष सुरु असलेल्या लढ्यात अखेर ग्राहक संघाचा विजय झाल्याचेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला संघाचे सल्लागार अ‍ॅड.एस.एफ पाटील, सहसचिव एन.के.कुळकर्णी, प्रा.डी.बी.पाटील, कार्याध्यक्ष एल.बी.शर्मा उपस्थित होते.
भडगाव तालुक्यातील उषा राजेंद्र पाटील यांनी डॉ.सुनिती बेंद्रे यांच्या पाचोरा येथील बेंद्रे हॉस्पिटल मध्ये कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केलेले होते. त्यानंतर त्यांना पोटात दुखत असल्याने त्यांच्या सासुबाई वत्सलाताई भिका पाटील यांच्या मार्फत ग्राहक सेवा संघ पाचोरा भडगांव यांच्याकडे तक्रार केली.

एमडी असल्याचे भासवून रुग्णांची फसवणूक
तक्रारीनुसार ग्राहक संघाने चौकशी केल्यावर डॉ. सुनिती बेंद्रे एम.डी.पदवीधारक नसतांना जाहिरातीत, व्हीजिटींग कार्डावर, जळगांव 1 मेडीकल डिरेक्टरीवर एम.डी.पदवी लावत असल्याचे तर येथीलच किर्ती शिंपी ह्या निवासी वैद्यकीय अधिकारी असल्याचे भासवून रुग्णांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबत ग्राहक संघाने महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल मुंबई रजिस्ट्रार, आरोग्य मंत्री यांच्यासह जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.

तक्रार केल्याचा राग आल्याने मानहानीचा दावा
तक्रार केल्याचा राग येऊन डॉ. सुनिती बेंद्रे यांनी ग्राहक सेवा संघाचे सरचिटणीस प्रा.डी.एफ.पाटील याच्यावर अब्रुनुकसानी झाली म्हणून पाल लखा रुपयांचा नुकसान भरपाई मिळावी म्हणून जळगांव कोर्टात स्पे.मु.नं.171/2002 चा दावा दाखल केला होता, तो मंजूर होऊन त्यात रु.1 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. वरील दाव्याचा निकालावर प्रा.डी.एफ.पाटील यांनी जळगांव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.पी.वाय.लाडेकर यांच्या कोर्टात दिवाणी अपिल नं.900/2012 दाखल केले होते. ते अपिल दि.28 फेब्रुवारी 2019 रोजी मंजूर होवून मूळ दावा आणि 1 लाख रुपये देण्याचे आदेश अपिल कोर्टाने रद्द केले आहे. तसेच डॉ. बेंद्रे यांना मुंबई मेडीकल कौन्सिलकडूनही दोषी ठरवून समज देण्यात आल्याचेही प्रा.डी.एफ पाटील यांनी सांगितले. सदरील प्रकरणात डॉ. बेंद्रे यांनी उच्च न्यायालयात अपिल केले असून जिल्ह्यातील असा पहिलाच निकाल असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.