एमपीएससीच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच होणार; आयोगाचे स्पष्टीकरण

0

मुंबई: जगभरात कोरोनाचा कहर वाढतच चालल्याने पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. गर्दी होऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली असून परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)चा ही समावेश असल्याचे बोलले जात होते. मात्र राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. १६ ते ३१ मार्च या कालावधीत कोणतीही परीक्षा घेऊ नयेत अशा राज्य सरकारच्या सूचना आहेत. मात्र या कालावधीत राज्यसेवा आयोगाची कोणतीही परीक्षा नाही. पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ५ एप्रिल २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.

३१ मार्चपर्यंत करोनाच्या प्रादुर्भावाविषयी राज्यातील परिस्थितीचा आणि त्यावेळी राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल, असेही आयोगाने कळवले आहे. त्यानुसार ५ एप्रिलच्या पूर्व परीक्षेबाबत फेरआढावा घेण्यात येणार आहे. मात्र तूर्त तरी ५ एप्रिलला परीक्षा होईल असे मानून उमेदवारांनी अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी.

राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची सूचना दि. १५ मार्च २०२० च्या शासन पत्राद्वारे केली आहे. मात्र, आयोगाच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार १६ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत आयोगामार्फत कोणतीही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित नाही असे आयोगाने म्हटले आहे.