एमबीबीएस-बीडीएस अभ्यासक्रमातही सवलत द्या

0

मुंबई (सीमा महांगडे-राणे) । राज्यातील मराठा समाजाने काढलेल्या मोर्चानंतर दिलेल्या आश्‍वासनानुसार आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना 605 कोर्सेससाठी शिष्यवृत्तीसाठी मान्य करण्यात आलेली 50 टक्के गुणांची अट चालू 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस यांसारखे महत्त्वाचे अभ्यासक्रम वगळण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाचाही सरकारने सवलतीच्या विषयांत समावेश करावा अशी मागणी आता मराठा समाजाच्या अभ्यास गटाकडून करण्यात येत आहे.

एमबीबीएस, बीडीएससाठी चढाओढ
या अभ्यासक्रमांचे शुल्क आधीच अव्वाच्या सव्वा असते. त्यात राज्यात आणि केंद्रात या अभ्यासक्रमांच्या जागा मर्यादित असल्याने प्रवेशासाठी चढाओढ असते. आधीच आरक्षण नसल्याने गुण2वत्ता असूनही मराठा समाजातील विद्यार्थी या जागांना मुकावे लागते. त्यामुळे निदान इतर अभ्यासक्रमांप्रमाणे यांचा समावेश करून मराठा समाजातील विद्यार्थ्याना दिलासा द्यावा अशी मागणी या अभ्यास गटामार्फत करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 10 हजार रुपये
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची कार्यवाही सुरू असून त्याचे बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर वसतिगृह सुरू करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांच्याकडून दिल्या गेल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्णत्वास जाईपर्यंत वसतिगृहात राहत नसलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दरमहा शहरामध्ये 10 हजार आणि ग्रामीण भागात 8 हजार रुपये भत्ता दिला जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महागड्या अभ्रासक्रमातही सवलत द्या
फडणवीस यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती देण्याचे मान्य केले होते. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्ये विभागाच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र एमबीबीएस, बीडीएस सारख्या मोठ्या आणि महागड्या अभ्यासक्रमांसाठी याचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठी समाजाला सवलत दिली जात असताना या अभ्यासक्रमांचाही समावेश सरकारने करावा. जेणेकरून मराठा समाजाचे विद्यार्थी या विषयांतही आघाडी घेतील, त्यांना त्याचा लाभ होईल अशी आशा मराठा उपसामितीच्या बैठकीत उपस्थित राहणार्‍या अभ्यासगटाने दर्शविली आहे.