पारदर्शक कारभार, सर्व खात्यात भ्रष्टाचारः महादेव बाबर यांचा हल्लाबोल
हडपसर : भाजपचे आमदार व मंत्री हे अधिकार्यांचे चमचे झाले आहेत. त्यामुळे अधिकार्यांसाठी येथे ऍम्प्रेस गार्डन येथे होणार्या बांधकामाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. येथे अधिकार्यांसाठी शासकीय इमारत बांधली जात आहे. त्यामुळे येथे इमारत आम्ही बांधु देणार नाही. पारदर्शक च्या नावाखाली सर्व खात्यात भ्रष्टाचार सुरू आहे, भाजपच्या सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही. तर भाजपच्या निर्णयाची होळी करून जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना शहरप्रमुख महादेव बाबर यांनी दिला आहे.
भैरोबनाला पोलीस चौकी समोर माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर शिवसेनेच्या वतीने ऍम्प्रेस गार्डन येथे नियोजित इमारतीच्या निर्णया विरोधात ऑक्सिजनचे सिलेंडर व तोंडाला मास्क लावून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाबर बोलत होते. यावेळी भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, विजय देशमुख, संजय मोरे, शहर संघटक अमोल हरपळे, नगरसेवक प्रमोद भानगिरे, नगरसेविका संगिता ठोसर, पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख समीर तुपे, अभिमन्यू भानगिरे, प्रसाद बाबर, बाळासाहेब शिंदे, राम खोमणे, ऍम्प्रेस गार्डन बचाव समितीचे डॉ. श्रीनाथ कवडे, शांताराम कवडे, चंद्रकांत कवडे व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
जागा गिळंकृत करण्याचा डाव
पुढे बोलताना बाबर म्हणाले, एम्प्रेस गार्डन मधील जागेत शासकीय इमारत बांधण्याचा डाव फडणवीस सरकारने चालविला आहे, फक्त पोकळ आश्वासने देऊन गार्डनची जागा गिळंकृत करण्याचा डाव आहे, पुण्याचे हृदय असलेल्या एम्प्रेस गार्डन ला धक्का लागला तर पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना संपर्कप्रमुख महादेव बाबर यांनी दिला.
थापड्या आमदार, चौकीदार गायब
हडपसर मधील गार्डन, रस्ते, वाहतूककोंडी प्रश्न प्रलंबित असताना, फ्लेक्सबाजी करणारा हडपसरचा भाजपचा थापड्या आमदार थापा मारण्यात तरबेज आहे, सभा घेऊन रेटून खोटे बोलतो, 1800 कोटींची कामे दाखविली 18 कोटी बक्षीस शिवसेना देणार 56 इंचाची छाती असणार्या चौकीदाराची माणसे निरव मोदी, चोक्सी, ललित मोदी, भाटिया पैसे घेऊन पळून गेले आहेत, मला चौकीदार नेमा म्हणणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प आहेत, बोलबचन करून देशाचा विकास होत नाही. सत्ताधारी भाजपविरोधात आंदोलन तीव्र करणार.असे बाबर म्हणाले.