एम. जे. अकबर : पत्रकार ते परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री!

0

केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक बदल होत असताना ज्यांचे परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्रीपद पूर्ववत ठेवण्यात आले आहे ते आहेत, एम. जे. अकबर! इंग्रजी पत्रकारितेत त्यांच्याइतका अफाट अनुभव गाठीशी असलेला अथवा त्यांच्या तोलामोलाचा पत्रकार निदान आजच्या घडीला तरी कुणी असेल असे वाटत नाही! पश्‍चिम बंगालमध्ये जन्मलेले मुबशर जावेद अकबर अर्थात एम. जे. अकबर यांचे आजोबा हिंदू होते. मात्र, ते मुस्लीम कुटुंबात लहानाचे मोठे झाले असल्याने त्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता. एम.जे. यांनी इंग्रजी साहित्यात कोलकाता विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर मुंबईला येऊन टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकारितेचा ओनामा गिरवायला सुरुवात केली. इलस्ट्रेटेड वीकलीचे उपसंपादक झाले. पुढे कोलकोत्याहून प्रकाशित झालेल्या संडे या इंग्रजी राजकीय साप्ताहिकाचे पहिले संपादक होण्याचा मान त्यांना मिळाला.

हैदराबादच्या डेक्कन क्रॉनिकलचे ते प्रमुख संपादक होते. 1982 साली कोलकात्याच्या आनंद बझार पत्रिका समूहाने दी टेलिग्राफ या नावाचे दर्जेदार इंग्रजी दैनिक एम. जे. अकबर यांच्या संपादकत्वाखाली जेव्हा सुरू केले तेव्हा मी कोलकात्यात राहत असल्याने त्याचा अगदी पहिल्या अंकापासून मी वाचक झालो होतो. त्यांनी शेकडो लेख आणि अनेक पुस्तके लिहिली आहेत. Nehru : Making of India, Kashmir Behind the Vale, Riot after Riot, Jihad conflict between Islam and Christianity, India : The Sledge within, Shade of Swords, Tinderbox : The Past Future of Pakistan, Have Pen, will Travel, Observations of a Globe Trotter या त्यांच्या पुस्तकांपैकी शेवटची दोन प्रवासवर्णनपर पुस्तकेवगळता अन्य सगळ्या पुस्तकांतून त्यांनी राजकीय समस्यांचा आणि घडामोडींचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे. टाइम्समध्ये असताना त्यांची एका ख्रिस्ती धर्मीय पत्रकार तरुणीशी मैत्री झाली होती. पुढे तिच्याशीच त्यांचा प्रेमविवाह झाला. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलाचे नाव त्यांनी आपल्या हिंदू आजोबांच्या स्मरणार्थ प्रयाग असेच ठेवले आहे. मुलीचे नाव मुकुलिका असून तीदेखील शिक्षणासाठी इंग्लंडलाच, केम्ब्रिज येथे होती. एम. जे. अकबर यांना अनेकवर्षे वैचारिक दृष्टीने काँग्रेस पक्षच जवळचा वाटत होता. राजीव गांधी यांचे ते निकटवर्तीय होते. 1989 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर बिहारमधल्या किशनगंजमधून लोकसभेवर निवडूनही गेले होते. तथापि, दोन वर्षांनी ते पुन्हा पत्रकारितेकडे वळले होते. अगदी अलीकडेच म्हणजे अवघ्या साडेतीन-चार वर्षांपूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाले आणि मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले. मोदींच्या मंत्रिमंडळात, 2016च्या जुलै महिन्यात ते परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री झाले! आता यापुढेही ते त्याच पदावर कार्यरत असणार आहेत, अशा या व्यक्तीशी माझी गाठ कुठे आणि कधी पडली, ठाऊक आहे? थेट पाकिस्तानात! तीही अगदी दुपारच्या रणरणत्या उन्हात, लाहोरमधल्या सुप्रसिद्ध अनारकली बाजारात! तेव्हा ते एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून भारत-पाक यांच्यातला पन्नास-पन्नास षटकांचा, एक दिवसीय क्रिकेट सामना बघायला, मार्च 2004 मध्ये लाहोरला आले होते आणि मीही एक सामान्य प्रेक्षक म्हणून तिथे आलो होतो. आम्ही दोघांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारले त्यावेळी मी कल्पनाही केली नव्हती की, त्या साध्याशा हॉटेलात निःसंकोचपणे बसून, काचेच्या कळकट ग्लासातला तो चहादेखील अगदी चवीने पीत-पीत माझ्याशी इतक्या आपुलकीने गप्पा मारणारे आणि देशविदेशातल्या माझ्या प्रदीर्घ साहसी मोटारसायकल प्रवासाचे तोंडभर कौतुक करणारे हेच एम. जे. अकबर अवघ्या बारा वर्षांनंतर एके दिवशी थेट केंद्रीय मंत्रिमंडळात भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री म्हणून दिल्लीत कार्यभार स्वीकारणार आहेत.

-प्रवीण कारखानीस
9860649127