एरंडोलनजीक भीषण अपघातात चौघे जागीच ठार

अपघातामुळे महामार्ग ठप्प : पिंपळकोठ्याजवळ उभ्या ट्रकवर चारचाकी आदळल्याने अपघात

भुसावळ/एरंडोल : भरधाव कार उभ्या ट्रकवर धडकलेल्या घडलेल्या अपघातात चौघे जागीच ठार झाले तर अन्य एक जण अत्यवस्थ आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या पिंपळकोठा गावाजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये विजयसिंग हरी परदेशी (58), चतरसिंग परमसिंग परदेशी (38, दोन्ही रा.जामडी), तुषार उर्फ जयदीप मदनसिंग परदेशी (35 ह.मु.जळगाव) व आबा रामचंद्र पाटील (58 रा.वडजी, ता.भडगाव) यांचा समावेश आहे तर रायसिंग पदमसिंग परदेशी (35, रा.जामडी) हे जखमी आहेत.

उभ्या ट्रकवर आदळली चारचाकी
जामडी येथून परदेशी परीवारातील सदस्य भडगाव येथे विवाहासाठी कारने (क्र. एम.एच.19 सी.झेड 7360) आले होते. विवाह समारंभ आटोपल्यानंतर सर्वजण कारने एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी तुषार उर्फ जयदीप मदनसिंग परदेशी यांना भेटण्यासाठी एरंडोल येथे आले मात्र तुषार परदेशी हे रींगणगाव येथे गेल्याने कारमधील सर्वच रींगणगावी गेले व परदेशी यांना सोडण्यासाठी ते जळगाव येथे जात असताना पिंपळकोठा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक एम.एच.18 ए.ए.8857) वर चारचाकी आदळली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.

भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ
चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील रहिवासी जयदीप मदनसिंग राजपूत हे एरंडोल येथे शासकीय रुग्णालयात औषध निर्माण अधिकारी होते मात्र ज्या रुग्णालयात सेवा बजावली तेथेच त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्याची वेळ आली. अपघातानंतर एरंडोल पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, हवालदार अनिल पाटील, पंकज पाटील, महेंद्र पाटील, मिलिंद कुमावत, अकिल मुजावर, विकास खैरनार, महेंद्र चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेत अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरु केली. दरम्यान, मयत चतरसिंग परदेशी हे जामडी ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, आई व पत्नी असा परीवार आहे तर विजय परदेशी हे जामडी येथील आदर्श शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परीवार आहे. मृतांवर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.