एरंडोलमध्ये पोलीस पथकाचे शहरात लक्षवेधीपथसंचलन

0

एरंडोल । शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पुर्ण झाली असुन पुरेशा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, गृह रक्षक दल व दंगा नियंत्रण पथकातील कर्माचार्‍यांनी शहरातून पथ संचलन केले. विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाला महसुल कर्मचारी तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी परीश्रम घेत आहे.

रात्री उशिरापर्यंत होणार विसर्जन
शहरात अठरा नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच सुमारे 80 लहान मंडळांनी गणपतीची स्थापना केली असल्याने मंगळवार 5 सप्टेंबर रोजी गणपतींचे भव्य मिरवणूक काढुन विसर्जन करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजेपासूनच लहान मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत तर सर्व अठरा प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस दुपारी 2 वाजता सुरुवात होऊन मध्यरात्रीच्या सुमारास सर्व गणपतींचे विसर्जन करण्यात येईल. विसर्जन मिरवणुकीत शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक सहभागी होत असतात. तसेच हिंदु भाविकांबरोबरच अल्पसंख्यांक समाजातील नागरिक देखील मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात.

गणेश उत्सव मिरवणुक सर्व भाविकांनी तसेच मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी उत्साहात व शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. मिरवणुकीत गोंधळ निर्माण करून शहरातील शांतता भंग करणार्‍या समाज कंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
– बाळासाहेब केदारे, पोलीस निरीक्षक, एरंडोल.