एरंडोलला उपनगराध्यक्षपदी भाजपचे जाहिरोद्दिन शेख

0

एरंडोल : येथील नगरपालिका सभेत उपनगराध्यक्ष निवडीत भाजपचे, शिवसेना, काँग्रेस व अपक्ष आघाडीचे जाहिरोद्दिन शेख कासम हे तिन मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मोमीन अब्दुल शकुर अब्दुल लतीफ यांचा पराभव केला. या निवडीसाठी हात उंच करून मतदान घेण्यात आले. भाजप आघाडीचे जाहिरोद्दिन शेख कासम यांना अकारा तर राष्ट्रवादीचे शकुर लतीफ यांना नऊ मते मिळाली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणुन भाजप आघाडीचे डॉ.नरेंद्र ठाकुर तर राष्ट्रवादीचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेत राष्ट्रवादीचे 9, शिवसेनेचे 5, भाजप 4, काँग्रेस 1, अपक्ष 1 अशी सदस्य संख्या आहे. आज नगरपालिका सभागृहात सकाळी 11 वाजता नवनिर्वाचित सदस्यांची सभा उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोमीन अब्दुल शकुर अब्दुल लतीफ तर भाजपतर्फे जाहिरोद्दिन शेख कासम या दोघांनी अर्ज दाखल केल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षांसह बार सदस्यांनी जाहिरोद्दिन शेख यांच्या समर्थनार्थ हात उंचावल्याने ते उपाध्यक्षपदी तिन मतांनी निवडून आल्याचे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी जाहीर केले. तर यावेळी भाजप आघाडीचे डॉ.नरेंद्र ठाकुर व राष्ट्रवादी काँग्रेसचे मोमीन अब्दुल शकुर अब्दुल लतीफ यांची बिनविरोध स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम हे अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट संचालित अंग्लो उर्दू हायस्कुल व ज्यु.कॉलेजचे चेअरमन आहेत. तर स्वीकृत नगरसेवक प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील हे दादासाहेब डी.शं.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत तर डॉ.नरेंद्र ठाकुर हे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपतर्फे नगरसेवक पदासाठी पराभुत उमेदवार असून माजी उपनगराध्यक्षा डॉ.गीतांजली ठाकुर यांचे पती आहेत.यावेळी शहरातील विविध सामाजिक,शैक्षणिक व क्रीडा संघटनांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार केला. प्रसंगी भाजपचे संघटन मंत्री किशोर काळकर, तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, शहराध्यक्ष निलेश परदेशी, मधुकर देशमुख, पिंटू राजपूत, सचिन विसपुते, बाजीराव पांढरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे,अमित पाटील,प्रा.एन.एस.पवार,प्रभाकर पाटील,नगरसेवक नितीन महाजन,कृणाल महाजन,असलम पिंजारी,योगेश महाजन,नितीन चौधरी, अभिजित पाटील, वर्षा शिंदे, छाया दाभाडे, जयश्री पाटील, आरती महाजन, कल्पना महाजन, दर्शना ठाकुर, डॉ.सुरेश ठाकुर,बानोबी बागवान, गटनेत्या सरलाबाई पाटील, प्रतिभा पाटील, सुरेखा चौधरी यांचेसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.