एरंडोलला सत्यशोधक पद्धतीने विवाह

0

माळी समाजातील उच्च शिक्षित वधू वरांचा स्तुत्य उपक्रम

एरंडोल – समाजातील जुन्या रूढी व परंपराना फाटा देऊन महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शहरातील माळी समाजातील उच्च शिक्षित तरुणाने सत्यशोधक पद्धतीने विवाह करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय उच्च शिक्षित वराने घेतला.त्यास त्याच्या कुटुंबीयांनी पाठींबा देऊन विवाह सोहळा उत्साहात झाला.
एरंडोल शहरातील गणेश शिवराम महाजन यांचा उच्च शिक्षित मुलगा दिनेश याचा विवाह अजंग (ता.जि.धुळे) येथील माजी सरपंच अनिल तोळाराम माळी यांची उच्च शिक्षित असलेली कन्या पुनम हिचेशी ठरला होता. उच्च शिक्षित दिनेश याने विवाह सोहळा वैदिक पद्धतीने न करता सत्यशोधक पद्धतीने करण्याची इच्छा कुटुंबीयांसमोर मांडली. कुटुंबातील सदस्यांनी देखील दिनेश याने मांडलेल्या इच्छेस एकमुखी पाठींबा देऊन प्रोत्साहन दिले. काल (ता.२७) रोजी बालाजी मढी परिसरात हजारो नागरिकांच्या उपस्थित दोघांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावण्यात आला. विशेष म्हणजे वधू व वराने विवाह प्रसंगी कोणतेही बडेजावपणा व दिखावा न करता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील कपडे परिधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज,शाहु महाराज,संत गाडगे बाबा,डॉ,बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध,संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन वधू वरांनी करून विवाह सोहळा झाला.विवाह सोहळ्या प्रसंगी सत्यशोधक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भगवान रोकडे उद्योजक राजकिशोर तायडे,विलास माळी,गोविंद वाघ,शिवदास माळी यांनी कोणताही मोबदला न घेता सत्यशोधक पद्धतीने विवाहाचा विधी केला. सत्यशोधक पद्धतीने विवाह हा उपक्रम समाजात चांगली प्रथा निर्माण करणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विवाहा निमित्त अनाथ मुलांना मिष्टान्न भोजन वधू वरांनी स्वतः खाऊ घातले. विवाह सोहळ्यास माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाब वाघ,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,राजेंद्र चौधरी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,शिवसेनेचे नेते रमेश महाजन,दुर्गादास महाजन,माजी नगरसेवक संजय महाजन,प्रकाश चौधरी, शाम पाटील, आबा महाजन,प्रा.आर.एस.पाटील हे उपस्थित होते.