* एकाचा मृत्यु एक गंभीर;
* पाच जणांना अटक;
* शहरात तणावपूर्ण शांतता.
एरंडोल – शहरात युवकांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत १९ वर्षीय युवकाचा मृत्यु झाला असुन एक जण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीवर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या असुन पोलिसांनी एका गटातील पाच संशयितांना अटक केली असुन त्यांना न्यायालया समोर उभे केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला. सद्य स्थितीत शहरात तणावपुर्ण शांतता असुन पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. हाणामारी प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या संशयितांमध्ये राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे शहरातील वातावरण अधिकच तणावपुर्ण बनले आहे.
येथील दादासाहेब पाटील महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धा सुरु असतांना एका युवकाने मुलीची छेड काढल्यामुळे वादास सुरुवात झाली होती.तिन दिवसा पासुनच शहरात दोन्ही गटांमध्ये वादविवाद सुरु असतांना देखील पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.काल रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास अचानक दोन्ही गटातील युवकांमध्ये वाद होऊन त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली.या हाणामारीत युवकांनी धारदार व तिक्षण हत्यार,लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर केला. या हाणामारीत खंडू अशोक पाटील (वय १९) रा.अमळनेर दरवाजा एरंडोल व आबाजी रघुनाथ पाटील (वय ४३) रा.अमळनेर दरवाजा एरंडोल यांच्या पोटावर,पाठीवर व डोक्यावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्यामुळे त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.खंडू उर्फ उमेश अशोक पाटील याच्या पोटात खोलवर जखम झाल्यामुळे उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यु झाला. तर आबाजी रघुनाथ पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान शहरात तणावपुर्ण शांतता असुन पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरतील गुंडगिरी फोफावत चालली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान शहरास अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख यांनी भेट दिली.