आरक्षणाचे आश्वासन देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न-आमदार डॉ.सतीष पाटील
एरंडोल । आरक्षणाचे आश्वासन देऊन शासन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार डॉ.सतीष पाटील यांनी केला. सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या समाजबांधवांनी राज्यशासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला. आंदोलन शांततेत पार पडले.दरम्यान मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार डॉ.सतीष पाटील यांनी मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही असे प्रतिपादन आमदार डॉ.सतीष पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला अत्यंत बेजबाबदार पणाचे वक्तव्य करून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची अत्यंत तीव्र भावना असुन शासनाने त्वरित भूमिका घ्यावी अशी मागणी त्यानी यावेळी केली.दरम्यान धरणगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनामुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी काकासाहेब शिंदे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. बंद व आंदोलन शांततेत पार पडले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.