एरंडोल – महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहरात स्वच्छता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. काबरे विद्यालय व नगरपालिका यांची संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंतीचे औचित्य साधुन स्वच्छते बाबत जनजागृती आणि खेड्याकडे चला हा संदेश घेऊन शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थ्यांचे भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीचे उद्घाटन नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी हिरवा झेंडा दाखवुन केले. यावेळी फेरीत महात्मा गांधी यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, स्वच्छतेबाबतच्या घोषणा व संदेश फलक हे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते तसेच यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले.
कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष शकुर मोमीन, नगरसेवक जहिरोद्दिन शेख, नगरसेविका वर्षा शिंदे, सुरेखा चौधरी, आरती महाजन, कर निरीक्षक संजय मिसर, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, कामगार संघाचे अध्यक्ष अशोक मोरे, दीपक गोसावी, हितेश जोगी, मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने, जाजु विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, नगरसेवक, नगरसेविका, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, नगरपालिकेचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.एच.नेटके, आर.एम.कुलकर्णी यांनी केले तर आभार नरेश डागा यांनी मानले.