एरंडोल। राष्ट्रीय महामार्गापासून अमळनेर नाक्या कडून जाणार्या कासोदा रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. एक किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे चालकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे. सहा महिन्यापूर्वी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नियोजन मंडळाकडून मंजुरी मिळाल्याचे सांगितले होते, मात्र अद्यापपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात झालेली नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
साईडपट्ट्यांमुळे अपघात होण्याची शक्यता
एरंडोल येथुन कासोद्याकडे जाणार्या रस्त्यावर अमळनेर नाक्यापासून अंजनी नदीवरील पुलापर्यंत या सुमारे एक किलोमिटर रस्त्यावर दहा फुटांच्या अंतरावर खड्डे पडले असल्यामुळे रस्त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. या रस्त्यावरून चाळीसगाव, औरंगाबाद, येवला येथे दररोज शेकडो वाहने ये जा करीत असतात. मात्र रस्यांवर पडलेल्या अनेक वेळा वाहने रस्त्यावरच नादुरुस्त होऊन बंद पडत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यामुळे रस्त्यापासून सुमारे दीड ते दोन फुट खोल गेल्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन बाजूला घेण्यावरून चालकांमध्ये वाद होत असतात. तसेच रस्त्याच्या कडेलाच नागरिकांचा रहिवास असल्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एक किलोमिटर अंतर पार करण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागत असतो. सहा महिन्यापूर्वी सदर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजुरी मिळाली असल्याचे आमदार डॉ.सतिश पाटील यांनी सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत रस्त्याच्या कामास सुरुवात झालेले नाही. सद्यस्थितीत किमान रस्त्यावर पडलेले खड्डे तरी बुजविण्यात यावेत अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी या रस्त्यावरून नियमितपणे यांचा वापर असतांना देखील रस्त्याच्या दुरावस्थेकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.