एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय घट

0

एरंडोल । तालुक्यातील पळासदळ येथील अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय घट झाल्यामुळे भविष्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत असलेल्या जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एरंडोलसह कासोदा व ग्रामीण भागात अनेक गावाना अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो.सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ 5.39 टक्के जलसाठा असून वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रकल्पातून काही भागात शेतीसाठी पाण्याची चोरी केली जात असताना देखील संबंधित अधिकार्‍यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची ओरड नागरीकांकडून होत आहे.

नागरिकांनी देखील पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा अपव्यय होणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊ शकला नव्हता. तसेच प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले असले तरी वाढीव उंचीत बुडीत होणार्‍या हनमंतखेडे, सोनबर्डी व मजरे या तीन गावांच्या पुनर्वसनाची समस्या अद्यापपर्यंत सुटलेली नसल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यात अनेक अडचणी येत आहेत.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना आावश्यक
प्रकल्पातील जलसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाला कळविले आहे. प्रकल्पातील जलसाठ्यात घट होत असल्यामुळे पाण्याचे योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे. सध्या तालुक्यात केवळ दोन गावात पाण्याची समस्या निर्माण झाली असून भविष्यात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून अनेक खाजगी व सार्वजनिक नळांना तोट्या नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत गांभीर्याने दाखल घेण्याची आवश्यकता आहे.

गाळ काढण्याची गरज
प्रकल्पातील जलसाठा कमी झालेला असल्यामुळे प्रकल्पातील गाळ काढण्याची गरज आहे. तसेच प्रकल्पात असलेली झाडे पूर्णपणे सडली असल्यामुळे शहरात दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असून सडलेली झाडे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात होणारी घट लक्षात घेता संबधित अधिकार्‍यांनी जलसाठ्याचे योग्य ते नियोजन करून आगामी काळात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाण्याची समस्या लक्षात घेता नागरिकांनी देखील पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशानानाने केले आहे.