एरंडोल । दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असुन पावसाचे प्रमाण देखील कमी होत आहे. याला मुख्य कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात वृक्ष तोड. पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी विविध उपाययोजना केली जात आहे. जनजागृती विषयक कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहे. मागील वर्षी शासनाने संपुर्ण जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला होता. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र यात सकारात्मक बदल होत नसलयाचे दिसून येते. सुमारे पन्नास ते साठ वर्षापूर्वीचे असलेले हिरवेगार जिवंत वृक्षाना आग लावून जाळण्याचे प्रकार एरंडोल तालुक्यात बिनधास्तपणे सुरु आहे. तसेच सर्रासपणे वृक्ष तोड केली जात आहे. वनखात्याच्या अधिकार्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
पालिकेकडून वृक्ष वाचविण्याचे प्रयत्न
सुस्थितीत असलेल्या वृक्षांची देखील लाकडाचे व्यापारी खुलेआमपणे तोड करीत आहे. मागील आठवड्यात धरणगाव रस्त्यावर निंबाच्या विशाल वृक्षाला लागलेली आग पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी एक ते दीड तास प्रयत्न केल्यानंतर विझवली होती. नगरपालिकेचे कर्मचारी जळत असलेल्या वृक्षांवर पाणी मारुन वृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वन खात्याच्या अधिकार्यांनी त्वरित लक्ष घालून वृक्षांना आग लावणार्यांविरोधात कडक कारवाई करावी तसेच वृक्षतोड होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
वनखात्याचे दुर्लक्ष
तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात असून वनखात्याने याकडे सपसेल दुर्लक्ष केले आहे. वास्तविक प्रत्येक तालुक्यात वनअधिकारी नेमण्यात आले आहे. त्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वनविभागाने तात्काळ कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होण्याची शक्यता आहे. अर्धवट जळालेल्या वृक्षावर कुर्हाड चालविली जात आहे. जळत असलेल्या वृक्षाला वाचविण्याचा प्रयत्न काही पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत.