* बेरोजगारांना रोजगाराची निर्मिती
* ओल्या कचऱ्यापासून केली जातेय सेंद्रिय खत
एरंडोल – शहरात नगरपालिकेच्या वतीने पाच घंटागाड्याद्वारे घराघरातून जमा करण्यात येणाऱ्या ओल्या व सुका कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असुन ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खताचे उत्पादन केले जात आहे.
शहरात नगरपालिकेच्या वतीने दररोज पाच घंटागाड्यांद्वारे सुमारे सात टन सुका कचरा तर चार टन ओला कचरा असा अकरा टन कचरा जमा करण्यात येत आहे.ओला व सुका कचरा स्वतंत्ररीत्या जमा करून त्याचे विलगीकरण करून पालिकेच्या पद्मालय रस्त्यावरील घनकचरा प्रक्रीया केंद्रावर साठविण्यात येतो.संकलित करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यावर सुमारे दीड ते दोन महिने नैसर्गिक प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केल्यानंतर त्यावर योग्य त्या कल्चरची फवारणी करून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. सेंद्रिय खताची शेतक-याना अत्यल्प दराने विक्री करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.पालिकेने प्लास्टिक बाटल्या, थर्माकोल, काच, लोखंडी वस्तू, कापड, कागद व विद्युत उपकरणे जमा करण्यासाठी कचरा वेचक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व प्रकारचा सुका कचरा योग्य पद्धतीने विभागणी करून योग्य त्या कप्प्यामध्ये साठविण्यात येतो.पालिकेने जमा केलेल्या सुक्या कच-याची नुकतीच विक्री करण्यात आली असुन त्यापासून सुमारे पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.सुका व ओल्या कच-याचा पुनर्वापर प्रक्रियेद्वारे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न पालिकेतर्फे करण्यात येत आहे.पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थानांतर्गत कचरा मुक्त शहर हि संकल्पना साकार करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग व स्वच्छता विभागाचे कर्मचारी करीत आहेत.नगराध्यक्ष रमेश परदेशी,उपनगराध्यक्षा छाया दाभाडे व सर्व नगरसेवक यांनी कचरा संकलन व विलगीकरणासाठी शहरात जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.दरम्यान नागरीकांनी विशेषता:महिलांनी घरातील कचरा पालिकेच्या घंटागाडीतच जमा करून शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष रमेश परदेशी व मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले.