एरंडोल बसस्थानकावर पोलीस नियुक्त करण्याची मागणी

0

एरंडोल । उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनीही धुमाकूळ घातल्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एरंडोल बसस्थानकावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. गर्दीमुळे प्रवाशांमध्ये होणार्‍या वादांचे प्रकारही वाढल्याचे चित्र आहे.

चोरीच्या अनेक घटना
उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्नसराई यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. याच गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत असून प्रवाशांच्या वस्तू लंपास करण्याचे प्रकार समोर येत आहेत. दररोज अनेक प्रवाशांचे खिसे कापून रोख रक्कम देखील लांबवली जात आहे. प्रवासाच्या गडबडीत अनेक प्रवासी याबाबत तक्रार देखील करीत नसल्याचेही समोर आले आहे. एकीकडे प्रत्येक बसस्थानकावर पोलिसांची नेमणूक करण्यात येते, मात्र एरंडोल बसस्थानकावर पोलिसाची नेमणूक करण्यात आलेली नाही.

प्रवाशांमध्ये वाद
बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत असल्यामुळे बसमध्ये चढतांना- उतरतांना प्रवाशांमध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद देखील होत असतात. महिला प्रवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. एरंडोल पोलीस स्थानकात असलेले वाहतूक पोलीस केवळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना थांबवून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेत असल्याची ओरडही प्रवाशांमधून होत आहे. काही पोलीस कर्मचारी बसस्थानक परिसरात उभ्या राहत असलेल्या खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन थांब्याजवळ स्वार्थ साधतात.

बसफेर्‍या वाढव्याव्यात!
विशेषत: दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत तसेच दर रविवारी वाहतूक पोलिसांचे अवैध वाहतूक करणर्‍या वाहनांजवळ बैठक असल्याचा आरोपही काही प्रवाशांनी केला आहे. याबाबत स्थानिक पोलीस निरीक्षकांनी त्वरित लक्ष घालून बसस्थानकावर पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासह वाढलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर विशेष बसेस सुरू करण्याचीही अपेक्षा काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.