एरंडोल बसस्थानक परिसरात जेसीबीच्या मदतीने स्वच्छतेला सुरुवात

0

एरंडोल । येथील बस स्थानक व आगारातील समस्यांबाबत दैनिक जनशक्तीमध्ये सातत्याने पाठपुरवठा करण्यात येत होता. अखेर परिवहन विभागाने याची दखल घेत बसस्थानक परिसरातील स्वच्छतेला सुरुवात केले आहे. आगार प्रमुखांनी बसस्थानक परिसरातील काटेरी झुडपे काढण्याचे काम जेसीबी मशिनच्या सहाय्याने सुरु असून बसस्थानक परिसरातील स्वच्छता करण्यात येत आहे. बसस्थानक प्रवेशद्वावराजवळ मोठा जीव घेणा खड्डा पडलेला होता. या खड्यामुळे अपघाताची शक्यता होती. प्रवाशांसह वाहन चालकास देखील प्रवेशद्वारातुन वाहन काढणे जिकीरीचे होत होते. प्रवेशद्वाराजवळ असलेला खड्डा बुजविण्यात आल्याने प्रवासी व चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीतर्फे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी 11 रोजी परिवहन महामंडळ नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आगार प्रमुखांना गुलाबपुष्प देवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले होते. बस आगार व बसस्थानक परिसरातील समस्यांबाबत तालुक्याच्या समन्वय समितीच्या सभेत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. समन्वय समितीच्या सभेस आगार प्रमुख गैरहजर असल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार डॉ.सतिश पाटील यांनी आगार प्रमुखाना धरले.

दैनिक जनशक्तिकडून पाठपुरावा
बसस्थानकातील समस्या त्वरित सोडविण्याचे आदेश समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आले होते. मात्र सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील आगार प्रमुखांनी समस्यांकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या आदेशाला आगार प्रमुखांनी दाखविली केराची टोपली अशी बातमी दैनिक जनशक्तिमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. याबातमीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संतप्त झाल्याने त्यांनी गांधीगीरी पध्दतीने आंदोलन केले.

दिवे लावण्याचे आदेश
बसस्थानक परिसरात उजेड रहावा यासाठी दिवे लावण्यात आलले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिवे बंद असल्याने या ठिकाणी अनधिकृत व्यवसायाला चालना मिळत होती. तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणार्‍या प्रवाशांना उजेड नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. स्वच्छतेच्या कामासोबत आगार प्रमुखांनी परिसरातील दिवे लावण्याचे देखील आदेश दिले आहे. आमदार डॉ.सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली होती.