एरंडोल येथील दीपस्तंभ व्याख्यानमालेत डॉ. शालिग्राम भंडारी प्रतिपादन

0

 

एरंडोल – राग, संताप व क्रोधावर नियंत्रण ठेऊन संयम राखल्यास आयुष्यात कोणाशीही वाद होणार नाहीत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शालिग्राम भंडारी यांनी केले. आर्यन फाउंडेशन, दीपस्तंभ फाउंडेशन, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेच्या दुसर्‍या पुष्पात माझा जिवन प्रवास याविषयावर ते बोलत होते. एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज बिर्ला, नगराध्यक्ष रमेश परदेशी, विक्रीकर निरीक्षक योगेश पाटील, डॉ.रवी महाजन प्रमुख पाहुणे होते. यावेळी दीपस्तंभ परिवारातील मनोबल संस्थेचे अंध मार्गदर्शक पवन बुंदेला व अपंग पांडुरंग राठोड यांच्या मनोगतामुळे उपस्थित हजारो महिला व पुरुष भावना विवश झाले होते.

मनाची मशागत करणे गरजेचे
यावेळी डॉ.शालिग्राम भंडारी यांनी शरीर व मन निरोगी असेल तरच जीवनाचा खरा आनंद मिळू शकतो असे सांगितले. प्रत्येकाच्या जीवनात माणसांचे थवे असतात त्याचप्रमाणे विचारांचे देखील थवे असतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.सृष्टी सुंदर आहे. मात्र त्यापेक्षा देखील मनुष्य जास्त सुंदर आहे. युवकांनी तपस्वी, तत्पर व तेजस्वी रहावे असे आवाहन केले. आदर्श युवक निर्माण करणे गरजेचे आहे. मनाची मशागत करणे महत्वाचे असून मनाने कोणीही खचू नये. आयुष्य कोणासाठीही थांबत नाही असे सांगितले. यावेळी दोन्ही हात व पाय नसलेला अपंग युवक पांडुरंग राठोड यांनी शिक्षणाची जिद्द असल्यामुळे शरीराला होणार्‍या वेदनांकडे दुर्लक्ष करून आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती
आर्थिक परिस्थितीवर मात करून परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.वैष्णवी दंडवते या विद्यार्थीनीने सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास डॉ.नरेंद्र पाटील, नगरसेवक योगेश महाजन, हेमंत भोळे, प्रा.गौरव महाजन, आर.डी.पाटील, नरेश डागा, बी.के.धूत, डॉ.उज्वला राठी, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश ठाकुर यांचेसह डॉ.भंडारी यांच्या भुतडा, जेथलिया परिवारातील सदस्यांसह महिला, पुरुष, युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.