एरंडोल येथे भाम आड परिसरातील इमारतींची जीर्णावस्था

0

नगरपालिका प्रशासनाने दखल घेण्याची मागणी

एरंडोल: – येथील भाम आड परिसरातील पडक्या व धोकेदायक दुमजली घरामुळे कुठल्याही क्षणी दुर्घटना घडून जीवित हानी व आर्थिक हानी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या कामी त्वरित दखल घेत कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
पावसाळा लवकरच सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने शहरातील पडक्या व जीर्ण झालेल्या इमारती व घरांवर कार्यवाही करून संबंधित घरमालकांना नोटिसा पाठवून सदर मालमत्ता दुरुस्ती अथवा धोकेदायक भाग खाली उतरून घेण्याबाबत सूचना कराव्यात अथवा स्वतः न पा प्रशासनाने कार्यवाही करावी असे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

त्वरीत कार्यवाही करावी
भाम आड परिसरात पडलेली व जीर्ण झालेली इमारत असून याठिकाणी सद्यस्थितीत कोणाचेही वास्तव्य नाही. ही इमारत रस्त्यालगत असून या रस्त्यावरून दिवसाकाठी अनेक वाहनधारक व पादचारी नागरिकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. तसेच ही इमारत भरवस्तीत आहे. इमारतीच्या मागील हिस्सा हा बहुअंशी पडला असून बांधकाम देखील जेमतेम आहे. पावसाळा सुरू झाल्यावर एका दमदार पावसातच ही इमारत रात्री-अपरात्री केव्हाही खाली कोसळून दुर्घटना होण्याची भीती परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांतर्फे नगरपालिका प्रशासनाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत त्वरीत कार्यवाही करत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.