एरंडोल । एरंडोल व धरणगाव तालुक्यात यावर्षी जुलै महिन्यात सुमारे एक लाख दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील यांनी दिली. वृक्षलागवडी संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी दोन्ही तालुक्यात वृक्ष दिंडी काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले. शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी 1 ते 7 जुलैपर्यंत एरंडोल व धरणगाव तालुक्यातील 125 ग्रामपंचायतीमध्ये सुमारे एक लाख दहा हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीस 375 रोपे मोफत देणार
प्रत्येक ग्रामपंचायतीस प्रत्येकी 375 रोपे मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये शिस, निंब, बाभुळ, आवळा, सीताफळ, चिंच, करंज या वृक्षांचे रोपं वाटप करण्यात येतील. तसेच दोन्ही तालुक्यात अनेक ठिकाणी अल्पदरात रोपे विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्या नागरिकांना आपले निवास्थान परिसरात तसेच अन्य मोकळ्या जागांवर वृक्ष लागवड करावयाची असेल त्यांना देखील वनविभागातर्फे अल्पदरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील यांचेसह वनपाल सुनील पाटील,एस.जी.वाडीले,तुषार देवरे,एस.एस.बोरसे यांचेसह वनखात्याचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सर्व नागरिकांनी तसेच सहकारी संस्था व सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील यांनी केले आहे.
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणार
एरंडोल व धरणगाव तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करून सर्व वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येतील.वृक्षलागवडीसाठी जनसहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
– बी.एस.पाटील, वनक्षेत्रपाल, एरंडोल