एरंडोल शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह तोडल्यामुळे घाण रस्त्यावर

0

एरंडोल । येथील नगरपालिकेने म्हसावद रस्ता व अमळनेर दरवाजा परिसरातील महिलांसाठी असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह जीर्ण झालेले असल्यामुळे पाडविण्यात आले. मात्र जुन्या स्वच्छतागृहाचा साठलेला मैला उचलला नसल्यामुळे सर्व मैला रस्त्यावर वाहत आहे. रस्त्यांवर वाहत असलेल्या मैलामुळे याच परीसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी असलेले सार्वजनिक शौचालय तोडल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून पालिकेने महिलांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. तसेच शहरात ठिकठीकाणी कचर्‍याचे ढीग जमा झाले असुन पालिकेने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

महिलांचे शौचालय तोडल्याने पर्यायी जागा नसल्याने गैरसोय
शहरातील म्हसावदरस्ता, अमळनेर दरवाजा परिसरात महिलांसाठी असलेले सार्वजनिक शौचालय जीर्ण झाल्यामुळे पालिकेने कोणतीही पूर्व सुचना न देता पाडून टाकण्यात आले आहे. सदरचे संडास पाडण्यापूर्वी पालिकेने परिसरातील महिलांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती. मात्र पर्यायी व्यवस्था न करता अचानक संडास पाडल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असुन अत्यंत लज्जास्पद स्थितीत महिलांना उघड्यावरच प्रातःविधी करावा लागत आहे.

प्रमुख रस्त्यांवर कचरा
शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी काचार्‍याचे ढिग जमा झाले असुन याठिकाणी डुकरांचा व मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. प्रमुख गटारी तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असुन नागरिकांना सांडपाण्यातूनच ये – जा करावी लागत आहे. याबबात नगरपालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन महिलांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करावी तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व गटारी स्वच्छ कराव्यात, प्रमुख रस्त्यावर जमा झालेला केर कचरा उचलुन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

व्यवस्थेची मागणी
याबाबत महिलांनी पालिकेकडे तोंडी तक्रार केली असता जुने संडास जीर्ण झाल्यामुळे त्याठिकाणी नवीन संडासांचे बांधकाम करावयाचे असुन तुम्ही प्रातःविधीसाठी सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सार्वजनिक शौचालयात जा, असे सांगण्यात आले. संडासांचे बांधकाम होईपर्यंत पालिकेने फिरत्या शौचालयाची व्यवस्थेची मागणी केली आहे.