एरंडोल । स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याला हागणदारीमुक्त करणे हे शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हागणदारीमुक्तीसाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहे. यात यश येत असल्याचे चित्र आहे. एरंडोल शहराची केंद्रीय समितीच्या गुणवत्ता परिषदेच्या पथकाने तपासणी केली होती. समितीने एरंडोल शहर हागणदारीमुक्त झाल्याचे संदेश केंद्रीय समितीच्या पथकाने संदेश पाठवून जाहीर केले आहे. एरंडोल हागणदारीमुक्त झाल्याची माहिती नगराध्यक्ष रमेश परदेशी व मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांनी दिली. पालिकेने सहा महिन्यांपासून शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरीकांनी देखील सहकार्य केल्यामुळेच शहर हागणदारीमुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात दिल्ली येथील केंद्रीय समितीच्या गुणवत्ता परिषदेच्या सदस्यांनी 8 जुलै रोजी शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पालिकेच्या स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त करीत पालिकेने केलेल्या कामाचे कौतुक केले. आठवडे बाजार, पाताळनगरी, ज्ञानदीप व्यायाम शाळा, पांढरी प्रभाग, कासोदा दरवाजा, चुनाभट्टी यासह अन्य परिसरात असलेली स्वच्छता पाहून समितीने अहवाल दिला आहे. शाळांमधील शिक्षकांशी संवाद साधून हागणदारीमुक्ती साठी केले जात असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती जाणून घेतली होती. पालिकेच्या मुख्याधिकारी मोटघरे यांनी सर्व पालिका कर्मचार्यांना विश्वासात घेवून सार्वजनिक ठिकाणी प्रात:विधी करणार्या नागरिकाना प्रतिबंध केला होता. अमळनेर दरवाजा, म्हसावद नाका परिसर, अंजनी नदी पात्र, कासोदा दरवाजा गांधीपुरा परिसर या ठिकाणी पुरुष व महिला कर्मचार्यांची नियुक्ती करुन उघड्यावर शौच करण्यावर कारवाई केली. शहर हागणदारीमुक्त झाल्याचा संदेश प्राप्त होताच पालिका कर्मचार्यांनी पालिका कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा केला. शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांचेसह सर्व नगरसेवक व पालिका कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न केले.