एरंडोल शेतकी संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर पाटील

0

एरंडोल । एरंडोल तालुका शेतकरी संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सुधाकर पाटील एका मताने विजयी झाले. त्यांनी शरद पाटील यांचा पराभव केला. सुधाकर पाटील यांना आठ तर शरद पाटील यांना सात मते मिळाली. उपाध्यक्षपदी प्रभाकर ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्याच दोन गटात लढत झाल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये असलेले मतभेद समोर आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा संघाच्या सभागृहात पार पडली.

नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन : अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड बिनविरोध होण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे अखेर निवडणूक घेण्यात आली. यात सुधाकर पाटील यांनी शरद पाटील यांचा एका मताने पराभव करून विजय प्राप्त केला. तर उपाध्यक्षपदी प्रभाकर ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार अधिकारी श्रीमती एम.व्ही.जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना संघाचे व्यवस्थापक संभाजी पाटील व हिशोबनीस अरुण पाटील यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी धरणगाव समन्वय समितीचे अध्यक्ष पी.सी.पाटील, सुभाष पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, डॉ.सतिष देवकर, संभाजी चव्हाण, जानकीराम पाटील यांचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.