एरांडोल शहराच्या मधोमध असलेला मेन रोड अतिक्रमाणाच्या विळख्यात

0

एरंडोल । एरंडोल हे प्राचीन कालीन शहर असून शहराची मुख्य जुनी बाजारपेठ म्हणजे मेन रोड हि शहराच्या मधोमध असून शहरातील रस्ते हे अरुंद असून रहदारीस नेहमी अडथाडे निर्माण होऊन कोंडी होते. यामुळे शहरवाशींना मोठा त्रास सहन करावा लागतो याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे, मात्र प्रशासन कुठेही ठोस कारवाई करतांना दिसत नाही व दुसरीकडे नवीन बांधकाम करणारे नियमांची पायमल्ली करून नियमबाह्य काम करतांना दिसत आहे. यासर्व प्रकाराकडे प्रशासन मात्र डोळे झाक करत असल्याने नागरिकांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा आहे. तरी या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी त्वरित लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

एरंडोल नगरपालिकेची कुंभकर्णी झोप
मेन रोड वरील बांधकाम हे जीर्ण झाल्यामुळे आता व्यापारवर्ग सध्या नवीन बांधकाम करत असून नवीन बांधकाम हे नियम बाह्य होतांना दिसत आहे. नगरपालिका यासर्व प्रकाराकडे मात्र डोळेझाक करत असून यामागील गौडबंगाल काय? याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा आहेत व आपल्या समस्या कोण सोडवेल?, एरंडोलकरांचा मेन रोड अतिक्रमण मुक्त करून कायम स्वरूपी मोकळाश्वास कधी घेईल? असा प्रश्न सर्वांसमोर आहे. एकीकडे जिल्ह्यात मात्र अतिक्रमण हटावच्या मोहिमा राबविल्या जात असुन एरंडोल न.पा.मात्र कुंभकर्णी झोप घेत असुन ज्या ठिकाणी अतिक्रमण काढणे आवश्यक नसतांना त्या ठिकाणी मात्र अगदी सक्तीने व तत्काळ करीत आहे. शहरातील बुधवार दरवाजा ते पीर बखारूम बाबा तसेच मारवाडी गल्ली ते अमळनेर दरवाजा हा अतिक्रमणाचा मुख्य भाग व नवीन बांधकाम असुन तो सोडुन अनावश्यक अतिक्रमण हटाव मोहीम न.पा.राबवत आहे.गेल्या काळात एरंडोल न.पा.चे मुख्याधिकारी म्हणुन आलेले परिविक्षाधीन अमोल येडगे यांनी एरंडोल शहराचा अतिक्रमणाची होणारी कोंडी सोडवायचा बहुतांश प्रत्यत्न केला. परंतु सध्या त्यांच्या जागेवर कार्यरत असणार्‍या मुख्याधिकारी मात्र तसे कार्य करतांना दिसत नाही आहेत. नवनियुक्त नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.

वाहनचालक होतात हैराण
शहरातील अतिक्रमण व अरुंद रस्ते असल्याने तसेच एरंडोल शहरातील येणार्‍या रोजच्या डेलीसर्विसच्या वाहनांमुळे सायंकाळी व सकाळी शहरातील मेनरोड हे रहदारीने जाम होतात व नागरिकांना ते सहन करावे लागते.डेलीसर्विसची वाहने हि सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 9 यावेळात येऊन व्यापार्‍यांचा माल देणे व घेण्यासाठी रस्त्यात उभे असतात. वरील भागातील रस्ते हे अरुंद असल्याने गाडी उभी राहिल्याने एका बाजुने कशीतरी ती पास होते. त्यात शहरातील बहुसंख्य लोक हे शेतकरी असल्याने त्यांचे शेत्तातील काम करण्यासाठी बैल गाडीने जावे लागते. याच वेळेस रस्त्यात उभ्या असल्या डेली सर्विसच्या वाहनांमुळे त्यांनाही रोज या प्रकारास सामोरे जावे लागते व सायंकाळी थकून असलेल्या शेतकर्‍यांना मात्र भरलेल्या बैलगाडीसह या प्रकारामुळे रस्त्यात ताटकळत उभे रहावे लागते. प्रसंगी भांडणेही होतात व इतर वाहन धारकांच्या कर्कश ध्वनीमुळे मोठे ध्वनी प्रदूषण वाढून रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरात यामुळे छोटे-मोठे अपघात व आपसात वादविवाद हि नित्याची बाब झाली आहे.