एलईडीमुळे शहरात झाला झगमगाट

0

भुसावळ। शहरात गेल्या चार वर्षानंतर प्रमुख रस्त्यावरील बंद पथदिवे सुरु करण्यात येत असून 1 कोटी 10 लाख रुपये खर्चातून अत्याधुनिक असे एलईडी बल्ब बसविण्यात येत आहे. गुरुवार 8 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास भुसावळ- जळगाव नाका येथे नगराध्यक्ष रमण भोळे व उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या उपस्थितीत बल्ब बसविण्यात आले. जवळपास अर्ध्याहून अधिक भागात बल्ब बसविण्याचे काम पुर्ण झाले असून आठवडाभरात शहर पुर्णत: उजळून निघणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये  समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील 367 सेंट्रल पोलवर तब्बल 737 एलईडी दिवे बसवण्याचे काम पालिकेने दहा दिवसांपासून हाती घेतले. रमजान महिना असल्यामुळे प्राधान्याने खडकारोड भागापासून या कामाला सुरवात झाली. आठवड्याभरात सर्व सेंट्रल पोलवर दिवे बसविल्यामुळे संपुर्ण परिसर उजळून निघाला आहे.

काळोखात बुडलेल्या शहराला पुन्हा झळाळी
खडका रोडवरील सेंट्रल पोलवर 90 वॅटचे एलईडी दिवे बसविण्यात आले. यासाठी 1 कोटी 10 लाख रुपये खर्च होणार आहे. त्यातून 367 सेंट्रल पोलवरील 737 पथदिवे सुरु होतील. सोबतच पालिकेने शहरातील विविध आठ भागांत बसवलेल्या हायमस्ट दिव्यांची दुरुस्ती सुरू केली. पहिल्याच दिवशी खडका चौफुली आणि रजा टॉवर चौकातील हायमस्ट तर प्रांताधिकारी कार्यालयासमोरील एलईडी दिवे बसवून ते सुरू करण्यात आले. महात्मा गांधी पुतळा ते वसंत टॉकीज परिसरातील पथदिवे कार्यान्वित झाले. येत्या आठवडाभरात शहरातील सर्व रस्त्यांवरील सेंट्रल पोलवरील एलईडी दिवे सुरू होतील. परिणामी काळोखात बुडलेल्या शहराला पुन्हा झळाळी मिळणे शक्य होईल. शहरातील यावल रोड, जामनेर रोड आदी भागांतील सेंट्रल पोलवरील बहुतांश केबल नादुरुस्त आहे. यामुळे अपघाताच धोका वाढला आहे. हा धोका कमी करण्यासाठी आवश्यक तेथे नव्याने केबल आणि स्वीचबॉक्स बसवण्यात येतील.

सत्तांतरानंतर प्रमुख मार्गांवर बल्ब बसविण्याच्या कामास मिळाली गती यावल रोड, जामनेर रोड, जळगाव रोड, खडका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या प्रमुख रस्त्यांवरील सेंट्रल पोलवरील दिवे बंद असल्याने चार वर्षांपासून नागरिक अंधारात रस्ता शोधत आहेत. मात्र, उशिराने का होईना पालिकेत सत्तांतर होऊन भाजपाने सत्ता ताब्यात घेतली व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शहरातील एलईडी दिव्यांची स्वप्नपूर्ती केली आहे.

दिव्यांची पाच वर्षांची गॅरंटी
एजन्सीकडून दिव्यांची पाच वर्षांची गॅरंटी घेण्यात आली आहे. यामुळे दिवा फ्यूज किंवा नादुरुस्त झाल्यास तत्काळ बदलून मिळेल. आगामी पाच वर्षांत शहरात अंधाराचे साम्राज्य नसेल. सेंट्रल पोलवर नवीन दिवे बसवणे, हायमास्टची दुरुस्ती करण्यासह पालिकेने अंतर्गत भागातील ट्यूबलाइट, सोडीयम दिव्यांची दुरुस्ती सुरु केली आहे. यासाठी नवीन ट्यूब फिक्चर खरेदी करण्यात आले आहेत.

अत्याधुनिक दिव्यांचा समावेश
यापूर्वी साहित्य नसल्याने नगरसेवकांना पदरमोड करुन दुरुस्ती करावी लागत होती. शहरवासीयांसोबतच त्यांनाही दिलासा मिळेल. पालिकेने शहरातील सेंट्रल पोलवर बसवलेले एलईडी दिवे अत्याधुनिक आहेत. 75 आणि 90 वॅटच्या या दिव्यांचा प्रकाशझोत थेट जमिनीवर आणि पसरट पद्धतीने पडेल. प्रत्येक पोलवर दोन, तर वर्दळीच्या चौकांमध्ये तीन किंवा चार दिवे बसवण्यात येतील. यामुळे रस्ते आणि आजूबाजूचा भाग प्रकाशमय होण्यास मदत होणार आहे.