मुंबई| मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयासाठी एलईडी लाईट कंत्राटाबाबतच्या चौकशीचे आदेश डावलून खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले असल्याचे सांगत याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्दयाव्दारे बुधवारी स्थायी समितीत केली. पालिका रुग्णालयांच्या शस्त्रक्रिया विभागात एलईडी लाईट खरेदी करताना कंत्राटदाराने सीई सर्टिफिकेट देणे बंधनकारक होते. मात्र ते न देता टेक्निकल डॉक्युमेंट रिपोर्ट कंत्राटदाराने सादर केला असल्याचा आरोप शिंदे यांनी करत चौकशीची मागणी केली आहे. मागील 12 सप्टेंबरच्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर शिंदे यांनी आक्षेप घेत विरोध केला.
या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली. शिवाय चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करू नये अशी मागणी केली. या मागणीनंतर स्थायी समिती अध्यक्षांनी तसे आदेशही दिले होते. मात्र हा आदेश धाब्यावर बसवत चौकशी झाली नसतानाही त्या कंत्राटदाराला कंत्राट बहाल केले. दरम्यान याबाबत बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे हे प्रकरण समोर आणले.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे स्थायी समितीचा अवमान झाला असून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली. एलईडी ओटी लाईट खरेदीचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराने सीई सर्टिफिकेट द्यायला हवे होते. परंतु त्याने ते न देता टेक्निकल डॉक्युमेंट रिपोर्ट दिला. चौकशी करण्याचे आदेश असतानाही बनावट कागद पत्रे सादर करून कंत्राटदाराला कंत्राट दिले. असे असताना अधिकार्यांना कंत्राटदारांचा पुळका का? असा संतप्त सवालही शिंदे यांनी विचारला.