तळेगाव स्टेशन । तळेगाव नगरपरिषदेच्या स्टेशन विभागातील प्रभाग क्र. 2, 3, व 4 मधील विविध ठिकाणी बसविल्या जाणार्या 46 एल. ई. डी. पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. या कामासाठी अंदाजे 17 लाख खर्च येणार आहे. माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुलोचना आवारे यांच्या हस्ते आणि सुशील सैंदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका विभावरी दाभाडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
गेल्या वर्षभरात तळेगाव स्टेशन परीसरातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणून महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले. त्यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला. तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी स्टेशन व गावांना जोडणार्या रेल्वे भुयारी मार्गाचे काम युध्दपातळीवर चालू आहे. तसेच तळेगाव-चाकण रस्त्यालगत सिंडिकेट बँक ते रा. प. विद्यालयापर्यंत स्काय वॉक बांधण्याच्या कामाचा पाठपुरावा चालू आहे, असे सुशीला सैंदाणे यांनी सांगितले. आमदार बाळा भेगडे व युवा नेते किशोर आवारे यांच्या प्रयत्नातून स्टेशन विभागातील विविध प्रश्न सोडविण्यात नगरसेवक यशस्वी झाले आहेत. तर लवकरच शहरातील भुयारी गटार योजना, आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लागत आहेत, असे सुलोचना यांनी सांगितले. या कार्यक्रमास नगरसेवक संग्राम काकडे, रोहित लांगे, सचिन टकले तसेच गणपतराव काळोखे, सुनील पवार, उत्तम ओसवाल, राकेश ओसवाल, माधव जोशी आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत प्रकाश ओसवाल यांनी केले. तर आभार दीपक ओसवाल यांनी मानले.