उरण (अजित पाटील) – अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघाची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी, वेळणेश्वर (रत्नागिरी) येथे होत आहे. काही काही बड्या भाडंवलदार मासेमारांनी खोल समुद्रात एलईडी बल्बद्वारे प्रकाश पाडून मासेमारी करण्याचा जो नवा फंडा आणला आहे, त्याबाबत या बैठकीत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या खलाशांनीच आता एलईडी मासेमारी नौकेवर न जाण्याचा निर्णय घेतल्याने अशा नौका मालकांची पंचाईत होणार आहे. रत्नागिरीतील बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी ‘जनशक्ति’ला दिली.
पारंपरिक मासेमारी संकटात
वाढलेले डिझेल दर, मजुरीची वाढती किंमत आणि समुद्रातले प्रदूषण यामुळे आधीच पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यात आता हे भांडवलदारांचे एलईडी मासेमारी संकट उद्भवले आहे. पारंपारिक मासेमारी व्यवसाय त्यामुळे धोक्यात आला आहे. खोल समुद्रात आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या मासेमारीने मासळीच नामशेष होत आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार खलाशांनी यावर बंदीची मागणी लावून धरली आहे.
प्रचंड आर्थिक नफ्यामुळे आकर्षण
720 किमीचा विस्तीर्ण समुद्र लाभलेल्या महाराष्ट्रात मासेमारी करून उपजीविका करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. खोल समुद्रात पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्याबरोबर आधुनिक पद्धतीने मासेमारी केली जातेय. मात्र यातून अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या असल्याची तक्रार मच्छीमार व बोटीवर काम करणारे खलाशी करत आहेत. खोल समुद्रात प्रखर एलईडी दिव्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासे पकडले जात आहेत. या पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांची संख्या फार कमी असली तरीही मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या मासळीने प्रचंड आर्थिक नफा होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या एलईडीने मासेमारी करण्याचे प्रमाणही वाढत आहे.
पारंपारिक मच्छीमारांना अशक्य
एलईडी मासेमारीला कायदेशीर मान्यता असली तरी त्यात आर्थिक गुंतवणूक अधिक असल्याने सामान्य ट्रॉलर व्यावसायिक याकडे वळत नाहीत. लाखो रुपयांचे एलईडी बल्ब तसेच ट्रॉलरवर मोठे जनरेटर लावून मासेमारी करणे छोट्या मच्छीमारांना शक्य नाही. मासेमारी व्यवसायात यांत्रिक आधुनिकता आणण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असले तरी सर्वंकष विचार करणाऱ्या मच्छीमार व्यावसायिक, त्यावर काम करणारे खलाशी (मच्छीमार) यांचे मत याहून वेगळे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आधुनिकता असावी; पण मासेमारी व्यवसाय उध्वस्त होणारी नको. यापूर्वी स्पीड फिशिंग व ट्वीन फिशिंग बंद करण्याची मागणी केली जात होती.
छोट्या माशांची प्रचंड नासाडी
एलईडी फिशिंग मध्ये प्रखर दिव्यांमुळे खलाशांच्या डोळ्यांना इजा होत असल्याचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय या बोटींवर काम करणाऱ्या खलाशांचे प्रमाण जेमतेम 5 टक्के असले तरी या पद्धतीत सरसकट सर्व जातीची व आकाराची मासळी मिळते. मात्र छोट्या माशांची प्रचंड नासाडी होत असल्याने भविष्यात मासळीचा दुष्काळ पडण्याची भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे उर्वरित 95 टक्के खलाशी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
काय आहे “एलईडी फिशिंग”
एलईडी बल्ब मोठ्या यांत्रिकी बोटीतील जनरेटरच्या साह्याने प्रकाशित केले जातात. या प्रखर बल्ब दिव्यांच्या क्षमतेनुसार त्या प्रकाशाकडे आजूबाजूच्या 1 ते 10 किलोमीटर परिघातील मासे आकर्षिले जातात. 800-900 मीटर लांबीचे व 40 मीटर खोलीच्या लावलेल्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासे फसतात. यातील महत्वाचे मोठे किमती मासे उचलून बाकीचे तसेच टाकून देतात. यात माशांची मोठी नासाडी होते. राज्याच्या समुद्री हद्दीबाहेर 12 नॉटिकल मैलच्या पुढे केंद्राच्या हद्दीत मासेमारी केली जाते.
यासंदर्भात अलिबाग येथे दोन बैठका झाल्या आहेत. यातील पारित ठरावांची चर्चा जिल्हा सल्लागार समितीत करून तसा अहवाल राज्य शासनाला दिला जाईल.
-अविनाश नाखवा
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड अलिबाग
आम्ही कायदेशीरित्या मासेमारी करत आहोत. बंदीची मागणी करणाऱ्या एक दोन खलाशी संघटना म्हणजे सर्व खलाशी मच्छीमार नव्हेत.
-गणेश कोळी
उपाध्यक्ष, पर्ससीन वेलफेअर असोशिअशन, एलइडी फिशिंग व्यावसायिक