एलईडी मासेमारीला विरोध कायम

0

उरण : पुढील आठवड्यात रक्षाबंधनापासून खोल समुद्रातील मासेमारी सुरू होत आहे. त्याची लगबग महाराष्ट्राच्या विविध सागर किनार्यावर सुरू आहे. मात्र या मासेमारीतील सर्वात महत्वाचा दुवा असलेल्या खलाशांनी माश्यांची पैदाईशच संपविणारी एलईडी बल्बच्या सहाय्याने केली जाणारी मासेमारी करणार नसल्याचे स्पस्ट केले असल्याने मासेमार बांधवांसमोर पेच पडला आहे. खलाशी अगदी उद्याच्या 1 ऑगस्ट पासूनच मासेमारी नौकांवर चढणार असले तरीही कोणत्याही स्थितीत ते एल ई डी द्वारे केली जाणारी मासेमारी करणार नसल्याची माहिती अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी दिली. रत्नागिरीतील खलाशी बांधवांच्या मेळाव्यात झालेल्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करताना एकही खलाशी एल ई डी बल्बद्वारे केल्या जाणारी मासेमारी करणार नसल्याचे विश्वनाथ म्हात्रे यांनी जाहीर केले आहे.

समुद्रातील छोट्या मासळीची नाहक नासाडी
आधीच सततच्या प्रदूषणाने खोल समुद्रात ही मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यातच वाढलेले डिझेल दर, मजुरी ची वाढती किंमत यातून आधीच मासेमारी व्यवसायाचं धोक्यात आला आहे. या पार्शवभूमीवर काही बड्या भाडंवलदार मासेमारांनी खोल समुद्रात एल ई डी ब्लब द्वारे प्रकाश पाडून मासेमारी करण्याचे फॅड आणले आहे. यातून मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असली तरीही समुद्रातील छोट्या मासळीची नाहक मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.

पारंपारिक मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याची भीतीही
समुद्रातील मासळीच नामशेष करणारी ही एलईडी मासेमारी असून यावर बंदीची मागणी पारंपरिक मच्छीमार खलाशांनी लावून धरली आहे. खोल समुद्रात या आधुनिक पद्धतीने केल्या जाणार्या मासेमारीने पारंपारिक मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यातूनच आंदोलनात्मक पवित्रा घेत मासेमारी नौकांवर काम करणार्या खलाशांनीच एलईडी मासेमारी नौकेवर न जाण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला असून खलाशी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचा विश्वास विश्वनाथ म्हात्रे यांनी बोलतांना व्यक्त केला आहे .

नवीन समस्या निर्माण झाल्या असल्याची तक्रार
720 किमीचा विस्तीर्ण समुद्र लाभलेल्या महाराष्ट्रात मासेमारी करून उपजीविका करणार्यांची संख्या फार मोठी आहे. खोल समुद्रात पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणार्याबरोबर आधुनिक पद्धतीने मासेमारी केली जातेय. मात्र यातून अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या असल्याची तक्रार मच्छीमार व बोटीवर काम करणारे खलाशी करत आहेत. खोल समुद्रात प्रखर एलईडी दिव्यांचा वापर करून रात्रीच्या गर्द अंधारात मोठ्या प्रमाणात मासे पकडले जात आहेत. या पद्धतीने मासेमारी करणार्यांची संख्या फार कमी असली तरीही मोठ्या प्रमाणात मिळणार्या मासळीने प्रचंड आर्थिक नफा होत आहे.
जनरेटर लावून मासेमारी करणे छोट्या मच्छीमारांना शक्य नाही

एलईडी मासेमारीला कायदेशीर मान्यता असली तरी त्यात आर्थिक गुंतवणूक अधिक असल्याने सामान्य ट्रॉलर व्यावसायिक याकडे वळत नाहीत. लाखो रुपयांचे एलईडी ब्लब तसेच ट्रॉलरवर मोठे जनरेटर लावून मासेमारी करणे छोट्या मच्छीमारांना शक्य नाही. मासेमारी व्यवसायात यांत्रिक आधुनिकता आणण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असले तरी सर्वंकष विचार करणार्या मच्छीमार व्यावसायिक, त्यावर काम करणारे खलाशी (मच्छीमार) यांचे मत याहून वेगळे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आधुनिकता असावी पण मासेमारी व्यवसाय उध्वस्त होणारी नको. यापूर्वी स्पीड फिशिंग व ट्वीन फिशिंग बंद करण्याची मागणी केली जात होती.

एलईडी फिशिंग मध्ये प्रखर दिव्यांमुळे खलाशांच्या डोळ्यांना इजा
एलईडी फिशिंग मध्ये प्रखर दिव्यांमुळे खलाशांच्या डोळ्यांना इजा होत असल्याचे प्रत्यक्ष काम करणार्यांचे म्हणणे आहे. शिवाय या बोटींवर काम करणार्या खलाशांचे प्रमाण जेमतेम 5 टक्के असले तरी मासळीचा प्रचंड उपसा आणि होणारी प्रचंड नासाडी यामुळे समुद्रात मासळीची दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे उर्वरित 95 टक्के खलाशी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ शकते असेही काही खलाशांचे म्हणणे आहे . या सर्व पार्श्वभूमीवर उद्या – परवा पासून सुरू होत असलेल्या मासेमारीच्या हंगामात मासेमारी नौकांवर जाणार असले तरीही एल ई डी बल्ब द्वारे केली जाणार्या मासेमारी केली जाणार नसल्याचा निर्धार विश्वनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे .