एलबीटीसाठी होतोय व्यापार्‍यांचा छळ

0

धुळे । महापालिकेचा गाडा हाकण्यासाठी सर्वाधिक आर्थिक भरणा करणार्‍या व्यापार्‍यांना एलबीटीचे अधिकारी विविध मार्गाने छळत असून याबाबत माहिती देण्यास एलबीटी विभागामार्फत टाळाटाळ होत असल्याची गंभीर बाब स्थायी समितीच्या सभेत समोर आली आहे. तसेच निर्धारित विवाह नोंदणी शुल्कापेक्षा अधिकचे शुल्क आकारणी करुन जनतेची लूट करणार्‍या ठेकेदारांची मनमानी येथे सुरु असून हा ठेका रद्द करावा. गांडूळ खत प्रकल्पाला लागलेल्या आगीची चौकशी करावी. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशा विविध मागण्या दि.25 रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी केल्या. यावेळी सभापती कैलास चौधरी, सहाय्यक आयुक्त रवींद्र जाधव, नगरसचिव मनोज वाघ आदि सदस्य उपस्थित होते.

गांडूळ खताला लागलेली आग ही पुरावा नष्ट करण्यासाठी लावली असा आरोप संजय गुजराथी यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी. यावर सभापती चौधरी म्हणाले की, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तरी देखील सभा गृहाच्या सदस्यांसह घटनास्थळी भेट देऊन चौकशी करु. आयुक्तांवरील हल्ला हा निषेधार्ह असून या घटनेची सीआयडी आणि सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक साबीर मोतेबर यांनी केली.

अतिक्रमण काढल्याने नागरिक सभेत धडकले
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने कुठलीही पुर्वसूचना न देता देवपूरातील नवरंग पाण्याच्या टाकीजवळील अतिक्रमण काढल्याने व्यावसायीकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. या सर्व विक्रेत्यांनी दि.25 रोजी मनपाच्या स्थायी सभेत धडक मारीत न्यायाची मागणी केली. पूर्वसुचना दिली असती तर बेरोजगार व्हावे लागले नसते, अशी व्यथा यावेळी मांडण्यात आली. यावेळी सभापतींनी योग्य तो निर्णय घेण्याचे आणि न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.देवपूरातील नवरंग पाण्याच्या टाकीजवळ फळ विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेत्यांची अस्थाई अतिक्रमणे होती. मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने कुठलीही पुर्वसूचना न देता बुधवारी सकाळी हे अतिक्रमण भूईसपाट केले. त्यामुळे तेथील व्यावसायीकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला असून सर्व विक्रेते मुलाबाळांसह मनपा स्थायी समितीच्या सभेत धडकले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात शिष्टमंडळाने स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांची भेट घेवून निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून आम्ही व्यवसाय करीत असून अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरीक व बेरोजगार तरुणांचा यात समावेश आहे. काल कुठलीही पुर्वसूचना न देता आमची दुकाने काढण्यात आल्याने आमच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली. याठिकाणी कुठलेही पक्के बांधकाम नसल्याने आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर जयवंताबाई मोरे, फरीद अब्बास, नितीन चौधरी, जितेंद्र पाटील, भाऊसाहेब माळी, अनिल महाजन, संजय सोनार, माणिक प्रजापती, मुक्तार खाटीक, दीपक मोरे आदींसह जवळपास 50 जणांची नावे असून यातील एका शिष्टमंडळाने स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांची भेट घेवून न्याय मिळवून देण्याची विनंती केली असता चौधरी यांनी सहानुभूतीपुर्वक विचार केला जाणार असल्याचे आश्‍वासन दिले.

एलबीटीतून व्यापार्‍याचंचा छळ
नगरसेवक संजय गुजराथी म्हणाले की, एलबीटीच्या माध्यमातून सर्वाधिक कर शहरातील व्यापारी भरतात. पालिकेचा गाडा व्यापार्‍यांवर चालतो आहे. परंतू, सध्या व्यापार्‍यांना अव्वाच्या सव्वा एलबीटी भरण्याच्या नोटीसा प्राप्त होत आहे. त्यांच्यावर कारवाई होत आहे. या संदर्भात स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांना पत्र लिहून संबंधितांकडून माहिती घ्यावी, असे पत्र दिले होते. त्याचे काय झाले? याबाबत सभापती कैलास चौधरी यांनी सांगितले की, आम्ही पत्राद्वारे माहिती मागविली होती. एलबीटीच्या अधिकार्‍यांनी पुरेशी माहिती दिली नाही. याबाबत सभागृहात सहाय्यक आयुक्त अनुप दुरे यांनी सांगितले की, व्यापार्‍यांना कागदपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाते. या वेळेत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते. त्यानंतरही कागदपत्रे सादर न केल्यास व्यापार्‍यांवर कारवाई होते.तसेच एलबीटी संदर्भातील काही माहिती गोपनीय असल्याने ती सभापतींना दिली नाही. यावर गुजराथी यांनी गंभीर आक्षेप घेतला. खुद्द सत्ताधारी सभापतींना माहिती दिली जात नसेल तर सत्तेत राहून उपयोग काय? ही माहिती मी माहितीच्या अधिकारात मागवून सभागृहात मांडू शकतो, असाही दावा त्यांनी केला.

विवाह नोंदणी शुल्कात ठेकेदाराची मनमानी
विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मनपा उपनिबंधकाद्वारे दिले जाते. मात्र, या ठिकाणी ठेकेदारचीच मक्तेदारी आहे. निर्धारीत शुल्का पेक्षा अधिकचे शुल्क आकारले जात आहे. ही जनतेची लूट अनेक वर्षांपासून सुरु आहे, असा आरोप संजय गुजराथी यांनी केला. याबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल. सदर ठेका आठवडाभरात रद्द करण्यात येईल, असे आश्‍वासन सभापती कैलास चौधरी यांनी दिले. शहरातील बगीचांमध्ये लहान मुलांची गर्दी आहे. असे असतांना सरदार वल्लभभाई पटेल उद्यान धील साहित्यांची दुरावस्था झाली आहे.