एलसीबी ने रात्रभर रस्त्यावर जागून पकडला 593 किलो गांजा

0

दोन आलिशान कार, तीन संशयितांसह 70 लाखांचा मुद्देमाल जप्त ः

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची एैतिहासिक कारवाई 

चार संशयित घटनास्थळावर गाडी सोडून फरार

चाळीसगाव/जळगाव – तब्बल सात तास रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी पहारा देत अख्खी रात्र जागून काढली. जिल्ह्यातील कधी नव्हे एवढी मोठी कारवाई करून खळबळ उडवुन दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील ओझरजवळ मध्यरात्री दिड वाजता 593 किलो गांजा व दोन आलीशान कार यासह तीन संशयीतांना अटक केली आहे.

अकोला येथून दोन अलिशान कारमधून (एम.एच.14 ए.एन.6532 व एम.एच.15 जी.एल.1761) चाळीसगाव शहरात गांजा येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे गांजांची तस्करी होत असल्याची सर्वप्रथम पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी महेश पाटील यांना मिळाली होती. पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शन घेतले. व सहायक निरीक्षक रवींद्र बागूल, महेश जानकर, रामचंद्र बोरसे, संजय सपकाळे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, विनयकुमार देसले, रवींद्र भगवान पाटील, किरण चौधरी, दत्तात्रय बडगुजर, योगेश वराडे, अशरफ शेख, इद्रीसखान पठाण यांचे पथक तयार केले.

पोलीस वाहन आडवे लावून थांबविल्या कार
पथकाला विजय पाटील व नरेंद्र वारुळे हे तांत्रिक माहिती मिळवून पथकाला देत होते. या कर्मचार्‍यांची विभागणी करुन ठिकठिकाणी पथके नेमण्यात आली होती. यादरम्यान संशयितांनी मार्ग बदलल्याची माहिती मिळाल्यानुसार कारवाईचा प्लानही बददला. अशाप्रकार मध्यरात्री दीड वाजता ओझर गावाजवळ पोलीस वाहन आडवे लावून गांजा घेवून जात असलेल्या कार थांबविण्यात आल्या. कारवाईत पोलिसांनी तब्बल 593 कीलो गांजा किंमत सुमारे 44 लाख 47 हजार रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे तर आरोपीने वापरलेल्या दोन चार चाकी वाहन रुपये 26 लाख रुपये असे एकत्रित 70 लाख 70 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

या संशयितांना पाच दिवसांची कोठडी
याप्रकरणी शुभम राणा (वय 22, मराठा मंगल कार्यालय चाळीसगाव), भूषण पवार (वय 32,चामुंडा माता मंदिराजवळ चाळीसगांव) व रवींद्र गुलाबराव शिंदे (वय 53, रा.जुना सातारा कडू प्लॉट, भुसावळ) या तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य चार जण फरार झाले आहेत. याप्रकरणी सहाय्यक फौजदार मनोहर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2017 एन डीपीसी अ‍ॅक्ट कलम 8,20,22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातून हा गांजा अकोला येथे आला व तेथून चाळीसगावला आला. भुसावळातील एका जण अटकेत असल्याने उर्वरित चार जण कुठले आहेत, नेमका गांजा कोठे जात होता याची चौकशी पोलीस करीत आहेत.

रात्रभर एसीबीचे पथक रस्त्यावर
माहिती मिळाल्यानुसार वरिष्ठांचे मार्गदर्शन बापू रोहम पथकासह शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता रवाना झाले. यानंतर पथकाने ठिकठिकाणी पथके नेमली. रात्रभर प्रत्येकाने खडा पाहरा देत रात्र जागून काढली व मध्यरात्री ठरल्यानुसार कारवाई केली. मुद्देमाल,गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आटोपून पथक दुसर्‍या दिवशी सायंकाळी 4 वाजता परतले. अधिकारी, कर्मचार्‍यांनी शनिवारी अंघोळही केली नसल्याची माहिती मिळाली आहे. 2 मार्च ते 12 मार्च दरम्यान विशेष पोलीस महानिरिक्षकांनी मोठी कारवाईचे आदेश दिले होते. नेमकी जिल्ह्यात ही एैतिहासिक कारवाई झाली, त्यावेळी योगायोगाने आयजी जळगावातच होते.त्यांनी कारवाई करणार्‍या टीमचे कौतुक केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.