पुणे : भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेवरून वाद चिघळू लागला आहे. पेशव्यांचे वंशज आणि ब्राह्मण संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे.
घटनेला 200 वर्षे पूर्ण
1 जानेवारी 1818 ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. दलित संघटनांतर्फे हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही भीमा कोरेगावमध्ये कार्यक्रम होणार आहे. या घटनेला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने काही संघटनांनी पुण्यातील शनिवार वाड्यावर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
परिषदेत 40 संघटनांचा सहभाग
लोकशासन आंदोलन, संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच यांसह सुमारे 40 संघटना त्यात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे नव्या पेशवाईच्या विरोधातील एल्गार परिषद असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. दुसर्या बाजूला पेशव्यांचे वंशज तसेच ब्राह्मण संघटनांनी शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेण्यास विरोध दर्शवला आहे.