मुंबई । अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे जागतिक कीर्तीचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होणार आहे. या स्मारकाचे काम गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एल अँड टी कंपनीला देण्यात आले. तीन वर्षांत हे स्मारक पूर्ण होईल. अरबी समुद्रात हे स्मारक उभे राहत आहे. यासाठी राजभवनापासून 1.2 किलोमीटर व गिरगाव चौपाटीपासून 3.6 किलोमीटर तर नरिमन पॉइंटपासून 2.6 किलोमीटर अंतरावरील जागा निश्चित केली आहे.
प्रमुखांच्या उपस्थित मेटेंनी कंपनीला दिले पत्र
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी एल अँड टी कंपनीचे संचालक एम. व्ही. सतीश व सुशांत शहादेव यांच्याकडे आज या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे पत्र सुपूर्द केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.
एकूण 12 विभागांचे ना हरकत दाखले प्राप्त
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम करण्यास मिळणे हे आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असून हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे एल अँड टी कंपनीचे संचालक एम.व्ही. सतीश यांनी सांगितले. हे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी विविध विभागांचे 12 ना हरकत दाखले प्राप्त करण्यात आले आहेत.
अत्युच्च दर्जाचे काम
15 वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून भारत अत्युच्च दर्जाचे काम करू शकतो हे जगाला दाखवून देऊ.
-मुख्यमंत्री फडणवीस